पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही 'कंडम' या कथेतील एक दलित स्त्री आहे. ती एकटीच झोपडीत राहते आहे. तिचा लेक-सून बाहेरगावी आहे. तिच्या झोपडीत पाण्याचा एक घोटही शिल्लक राहिलेला नाहीए. भर दुपारी ती पाणी आणायला जाते आणि घोटभर पाणी पिऊन पाण्याचे मडके घेऊन येत असताना ती अशक्तपणामुळे एका दगडाला ठेचकळून पडते. तिचे मडके फुटते. ती थकून घरी येते. पुन्हा सायंकाळी पाय ओढत ती सामुदायिक विहिरीकडे जाते व तोल जाऊन पाण्यात बुडते. टँकरवाला रात्रीचा घाईगडबडीने तीन खेपा करून पाणी विहिरीत सोडतो. दुसऱ्या दिवशी गावात दोन घरांमध्ये दोन ठिकाणी लग्ने असतात. पण सकाळी जेव्हा बायजा विहिरीत पडून मेल्याची खबर पोहोचते तेव्हा त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो. दलितांसाठी दुसरी विहीर असताना ही इकडे का आली म्हणून गावकरी बायजेविषयी अनुद्गार काढतात. अपशब्द बोलतात. तिच्या प्रेतासाठी खड्डा खाणायला तिचे जातभाई हजर राहत नाहीत. कोण रोजगाराला तर कोण लग्नाकडे वळतो. संवेदनहीनांची ही वृत्ती पाहून भीमाच्या बोलण्यातून आपली जात ही 'कंडम' असल्याचा खेद व्यक्त होतो. तिच्या मृत्यूविषयी कोणालाच काही आत्मभाव नाही. 'माणूस आमचा धर्म अन् माणुसकी आमची जात' या तत्त्वाविरुद्ध वर्तन यात आले आहे. बायजाचा चटका लावणारा मृत्यू असाहाय्यतेची क्षुद्र जाणीव करणारा ठरतो. म्हातारपणाचे अभागी जीवन चटका लावणारे आहे.
४) चौथी आसरा : अमिना

 'अमिना' या शीर्षक कथेत याच मुस्लीम स्त्रीची व्यथा तीव्रतर झाली आहे. अमिना ही धर्म परंपरेने बुरख्याआड राहणारी स्त्री आहे. तिला पाच-सहा कच्ची बच्ची आहेत. तिचा नवरा कादर हा गवंडी काम करायचा पण तो बाहेरख्यालीही करायचा. त्याची या प्रपंचाला कवडीमोल मदतही होत नाही. लेकराबाळांची काळजी वाहणारी ती माऊली असल्याने ती रोजगार हमीच्या कामावर जायची. एवढी मुलं ती एकटी पोसायची. कादरला मात्र तिचे शरीर हवे असायचे. पण सततच्या बाळंतपणानं तिच्या शरीराचा चोथा झालेला असतानाही तो तिच्या शरीराला झोंबायचा. 'साली चिप्पड हो गयी है. कुछ मजा नहीं आता' असे बोलायचा. त्याची ही वासना ‘बांधा' कथेतील हणमंताशी समांतर आहे. जणू त्याचाच भाऊ म्हणून तो या कथेत वावरतो. अमीनाला रोजगार हमीच्या कामावर ‘कुटुंब कल्याण' बाबत विचारणा होते. एकीकडे दारिद्र्य, उपासमार यांच्या कैचीत सापडलेली अमिना दुसरीकडे नवऱ्याची मारझोड सहन करून मनात नसतानाही शरीर त्याच्याच हवाली करते. दोन्हीकडून स्त्रीच्या वाट्यास येणारी कुचंबणा सोसणारी ही स्त्री आहे. जणू वणव्यात सापडलेली गाय म्हणावी एवढी ती अस्वस्थ करून जाते.

९८ □ अन्वयार्थ