पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५) पाचवी आसरा : रखमा
 'मृगजळ' कथेमधील ही रखमा आपल्या समवयस्क 'भीमी' चे दुःख झेलणारी आहे. या दोघी समवयस्क आहेत. मात्र सततच्या काबाडकष्टाने भीमा लहान वयात झालेल्या लग्नामुळे पिचून गेली आहे. तर रखमा तालुक्याला हॉस्टेलमध्ये राहून डी. एड्. झालेली आहे. या गावात भीषण पाणीटंचाई आहे. या दोघीजणी भर उन्हात चंपकशेठच्या मळ्यातील पाण्याच्या विहिरीकडे जातात. साऱ्या गावात पाणीटंचाई असताना पाणीचोर चंपकशेठने ओढ्याच्या पात्रात विहीर खोदली आहे. कुंपण घालून मळा पिकविला आहे. दलितांची वाट बंद केली आहे. मात्र रखमा भर दुपारी जेव्हा विहिरीकडे वळते तेव्हा चंपकशेठचा दलपत हा वासनांध मुलगा तिला आपल्या कवळ्यात घ्यायला धजतो. ती त्यातून आपली सुटका करून घेते व याविरुद्ध आवाज उठवते. पैशाचा माज असणाऱ्या व गावाच्या जीवनमरणाशी खेळणाऱ्या शेठची विहीर गावासाठी खुली होते. भीमा ही सोशिक, असाहाय्य, दुबळी तर रखमा ही बंडखोर स्त्री आहे. मात्र दलित जातीतील स्त्रीची वेदना मात्र ठसठसती आहे.
६) सहावी आसरा : सारजा  दुष्काळाने श्रीमंतांचाही कणा मोडला तसाच सर्वसामान्यांचा कणा खिळखिळा केला. 'जगण्याची हमी' या कथेतील सारजाच्या वाट्यास येणारा दुःखाचा जो भोगवटा आहे तो सुन्न करणारा आहे. पैशावरून सतत मारझोड करणारा तिचा नवरा नुकताच आकस्मिकपणे पोलीस पाटील झाला आहे. एकतर 'ती' घरच्या गरिबीने त्रस्त आहे, 'तो' नाही. त्याला रोजगार हमीसारखी हलकीफुलकी कामं करणं म्हणजे त्याच्या पोलीस पाटील या पद-प्रतिष्ठेला बाधा ठरतं आहे. तो जेव्हा पोलीसपार्टीत असताना चैनीत जगायचा, दारू प्यायचा. तो तिला हे काम सोडून टाकण्यास सांगतो. मग पोराबाळाचं हाल होतील असं ती सांगते. त्याचा स्वाभिमान डिवचला जातो व तो मारहाण करतो. निरक्षर सारजा तो मार सहन करते. पण तिचं स्वगत मात्र चिंतनास भाग पाडते. ती म्हणते, "आपून सारीजणं काम करतो, बाप्पा गड्याइतकं कमावतो.... कितीतरी घरं पायलेत, जिथं बाप्पा गडी काम नाही करत बाईच करते. तिला गडीमानूस मारहाण करतो. कशाच्या जोरावर? कमावून आणतो तो खरा मरद गडी. इथं तर त्या बाईस्नी मर्द म्हनायला हवं."
७) सातवी आसरा : प्रज्ञा

 कथासंग्रहातील शीर्षक ही कथेची नायिका. अतिशय व्यापक कालतत्त्वाचा परीघ या कथेला लाभलेला आहे (यावर कोल्हापूरच्या तरुणांनी एक एकांकिकाही निर्माण

अन्वयार्थ □ ९९