पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उतरते. नि एके रात्री हणमंतराव तिच्या काळजाला घरं पडावीत असं म्हणतो, “हाडं हाडं लागताहेत नुसते..... मजा येत नाही.' पूर्वीसारखी म्हणजे स्त्री फक्त उपभोगाची वस्तूच असल्याचा निर्देश व्यक्त होतो. सबंध कथेत देशमुख यांनी ही अस्वस्थता पेरून ठेवली आहे. कामावर तर मुकादमाची लुबरी नजर तिचा पाठलाग करायची. दुष्काळी कामाने हरवून गेलेली काया आज ना उद्या पाऊस पडला आणि पीकपाणी वाढून समृद्धता येईल तेव्हा आपण मनाने पूर्वीसारख्या त्याच्याशी बांधील राहू काय? हा गजराचा प्रश्न अस्वस्थ करणारा वाटतो. पुरुषी आक्रमणाचा आणि स्त्रीच्या मूकपणाचा हुंकार या कथेतून व्यक्त होतो. नायिकेचे गजरा हे नाव हणुमंताच्या वासनेचे रूप म्हणावे लागेल. जेव्हा स्वत:ची बायको सुकून जाते तेव्हा तो शेवंता बाईकडे वळतो. रसवंती शरीराची अभिलाषा ही वासनेची पूर्ती समजून तो तिच्याकडे आकर्षित होतो. मात्र ऐतखाऊ हणमंताला तिच्या गजराच्या कष्टाचे कोणतेही सोयरसुतक नसणे हेही फार अस्वस्थ करणारे आहे.
२) दुसरी आसरा : ठकूबाई  दुष्काळ आणि गरिबी ज्यांच्या पाचवीला पूजली आहे, दिवसभर राबल्याशिवाय ज्यांची सांजेला चूल पेटत नाही, अशा दरिद्री महाराष्ट्रातील दारिद्र्याचे विलक्षण थरारचित्र 'भूकबळी' या कथेत श्री. देशमुख यांनी उभे केले आहे. राघू ननावरे या गाडीलोहार सामाजातील पुरुषाची ठकूबाई ही विधवा बहीण आहे. नवऱ्याच्या निधनानंतर भावाच्या घरी ती राहते आहे. त्याच्या जिवावर आयते बसून खाणे तिला पसंत नसल्याने थोडीफार मदत म्हणून तीही रोजगार हमीच्या कामावर जात असते. रोजगार हमीच्या कामाचा खोळंबा झाल्याने आणि रेशन दुकानदाराने वेळेत धान्य न दिल्यामुळे ठकूबाई ही उपासमारीने मरते. परंतु तिला कागदोपत्री आजारी ठरवले जाते. शासकीय सुविधांचा बोऱ्या कसा वाजतो यावरही या कथेत भाष्य येते. मात्र शिंदे या तहसीलदाराची अस्वस्थता या व्यवस्थेला कशी छेद देणार हाही एक अस्वस्थ प्रश्न उभा राहतो. ठकूबाईची उपासमारी ही मेळघाटातील उपासमारीची दुखरी आठवण करून देते एवढे निश्चित. एकूण व्यवहाराचे झालेले बाजारीकरण हा दुखरा घटक या कथेच्या मुळाशी आहे. एका स्त्रीचे भूकबळी जाणे म्हणजे आपण कोणत्या राज्यात वावरतो हा छळणारा प्रश्नही उपस्थित होतो. सोशिक आणि दरिद्री स्त्रीची अवहेलना हृदय पिळवटून टाकते. इतकी ती तीव्र झाली आहे.
३) तिसरी आसरा : बायजा

 वयानं सत्तरी गाठलेली, कमरेत बाक आलेली नि नजरेनं अधू झालेली बायजा

अन्वयार्थ □ ९७