पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार करता या जलाशयात राहणाऱ्या देवता आहेत. त्यांच्याविषयी विविध आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसार त्या भर दुपारी डोहाजवळ जाणाऱ्यास आत पाण्यात ओढून नेतात. त्याला किंवा तिला झपाटतात. अशी त्यांच्याप्रती जनमानसात एक प्रकारची भीती आहे. मात्र लोकमानसाचे, श्रद्धेचे ते एक रूप आहे. परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहातील कथांमधील असणाऱ्या या 'साती आसरा' मात्र पूर्णत: भिन्न आहेत. जरूर त्या क्षणभर सुख देणाऱ्या नाहीत तर मणभर दु:खानुभूती देणाऱ्या आहेत. काही कुमारी आहेत तर काही दुर्भाग्यवती आहेत. त्या जरी सकलगुणमंडित नसल्या तरी कष्टगुणसंपन्न आहेत. म्हणू त्यांना रोजगार हमीच्या कामावर जावे लागते. वासनेची शिकार व्हावे लागते. घोटभर पाण्यासाठी जीव गमवावा लागतो. एकूणच त्यांची चरित्रे ही भगभगीत आहेत. मानवी मनाला त्या नुसत्या झपाटत नाहीत तर दंशही करतात. त्या पाण्यात राहणाऱ्या नसून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आहेत. अंतरीचे गूढ सांगणाऱ्या विरहिणी नसून कोरभर सुखाच्या भाकरीसाठी कष्टणाऱ्यातिष्ठणाऱ्या आहेत. न्यायासाठी संघर्षशीलव्रती आहेत. निर्दावल्या भोवतालात त्या दुर्लक्षित आहेत.
 या संग्रहातील स्त्रिया या कणखर बाण्याच्या आहेत. परिस्थितीने गांजल्या आहेत. स्वत:साठी, सुखी संसारासाठी, आपल्या नात्यासाठी, चिमण्या लेकरांसाठी सुखाचा घास मिळावा म्हणून त्या आसुसल्या आहेत. पण ही आसक्ती केवळ स्वत:च्या सुखानुभूतीसाठी नाही तर आपल्या जीविताबरोबर दुसऱ्याच्या जीवाची काळजी घेणे हे त्यांच्या रक्तात आहे. या संग्रहाच्या मुखपृष्ठावर 'तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा' असे उपशीर्षक दिले आहे. मात्र संग्रहातील स्त्रियांच्या रूपाने ती दाहकता आपल्याला जाणता येईल. मी उपहासाने किंवा उपरोधाने त्यांची चिकित्सा, त्यांचे स्त्रीरूप शोधताना 'साती आसरा' हा शब्द निंदनीय म्हणून वापरलेला नाही. मुळात या कथांमधल्या स्त्रियांची अनुभूती झपाटणारी आहे. या स्त्रियांच्या दु:खाने मन व्याकूळ होते. त्या भिडतात म्हणून त्यांचे हे रूप रेखाटले आहे.
१) पहिली आसरा : गजरा

 ‘बांधा' या कथेची ही नायिका होय. तिचे लग्न एका प्रतिष्ठित घराण्यातील हणमंताशी होते. पिढीजात इनामदारकी उपभोगणाऱ्या हणमंताची काविळी / हिरवी नजर गजराचे जीवन पालटून टाकते. खानदानी मराठा कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या गजराच्या माथ्यावर दुष्काळाचा वरवंटा फिरतो. ज्याप्रमाणे परसदारी गाय हाडकून गेलेली असते त्याचप्रमाणे रोजगार हमीच्या कामावर तिला जावे लागल्याने तिचा देह हडकून जातो. सुडौल असणारा तिचा बांधा हळूहळू झडतो. पूर्वीची रया

९६ □ अन्वयार्थ