पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निषेध व्यक्त करते. स्वतंत्र लोकशाही राष्ट्राची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या वाट्यास अनन्वित छळ येतो. आणि या साऱ्या छळाचा, अन्यायाचा प्रतिकार म्हणून कडेलोट म्हणून ज्या राष्ट्राध्यक्षांचा दिवाणखान्यात फोटो लावलेला असतो त्या तसबिरीवर बिल्कीसबी गोळी झाडते व आपल्या जराजर्जर देहात सारी प्राणशक्ती एकवटून चौकात त्या तसबिरीवर नाचत हवेत बंदुकीच्या फैरी झाडते. राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेवर थयाथया नाचण्यातून तिच्या विकाराची सीमा प्रकटते. हा भारतीय आदिम स्त्रीचा चेहरा या कथेतून प्रकटला आहे. स्वाभिमानी बाणा जपणारी ही स्त्री देशमुख यांच्या कथेचे प्राणतत्त्व वाटते. इतके ते स्वाभाविक झाले आहे.
 स्त्री आणि पुरुष ही पृथ्वीची नैसर्गिक आणि दोन तत्त्वे (प्रकृती आणि पुरुष) होत. त्यासंबंधाचा अनुभव या दोहोंच्या उत्सर्जनाचा म्हणता येईल. 'नशिबाचा खेळ' ही अतिशय बोलकी कथा वाटते. या कथेमधील स्त्रीच्या वाट्याला येणारा पती हा मानसिक आणि बौद्धिक वयानुसार तो पाचेक वर्षांचा वाटतो. त्याच्या फक्त शरीराची वाढ झाली आहे. या कथेमधील स्त्रीने आपल्या अपत्यास स्वत:स नरडीस नख लावून मारलेले आहे. बालपण अतिशय हालअपेष्टांत गेलेल्या हिचे बालपणीचे भावविश्व कोमेजले आहे. तिच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तिच्या मामाने पैशासाठी तिला विकले आहे. तिची फसवणूक झाली आहे. कारण तिच्या पदरात मतिमंद नवरा येतो. परंतु एका नैसर्गिक क्षणी जे घडावयाचे ते घडते आणि जन्माला येणारे मूलसुद्धा बापाचेच दुसरे रूप वाटते. ते विकलांग म्हणून जन्माला येते. तेव्हा मात्र तिचा बांध फुटतो व ती त्या मुलाचा या घराण्याची, अन्यायाची परंपरा मोडीत काढण्यासाठी गळा घोटते. व स्वत:ची कैफियत न्यायालयात न्यायाधीशांसमोर सादर करते. अशी ही स्त्रीच्या वेगळ्या मुखवट्याची कथा साकार होते. आणि शेवटी मला 'मरेपर्यंत फाशी द्या' अशी विनवणी करते. नाही तर 'मी आत्महत्या करते' अशी चिथावणीही देते.
 मानवी भावभावनांचे, एक नव्या वासना - विकाराचे अतुलनीय चित्रण त्यांच्या कथेठायी आहे. स्त्रीच्या सर्जनाचा, तिच्या इच्छा - आकांक्षेचा आणि एका भावनिक कोलाहलाबरोबर तिच्या संघर्षाचा, विवेकाचा अनुबंध त्यांच्या कथेत प्रकटला आहे. स्त्रीच्या उन्नत परंतु अतर्व्य व्यक्तिमत्त्वाचाही पोषक परिपोष कथेमधल्या आशयाबरोबर साक्षात केला आहे.

॥५।।

'उदक' कथासंग्रहातील 'साती आसरा' चे स्वरूप : "साती आसरा"

 महाराष्ट्रातील स्त्रियांच्या भावविश्वाशी निगडित असे हे नाव. सात जणींनी जिथे आसरा घेतला ते ठिकाण म्हणजे जलाशयाचे ठिकाण होय. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा

अन्वयार्थ □ ९५