पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही खरी दुखरी नस आहे. त्यामुळे सारा देशाच्या हिताच्या दृष्टीने पक्षाच्या ध्येयधोरणांशी बांधील राहून शांतीचा मार्ग अवलंबण्याचा विचार करते. शेवटी 'देश कुणासाठी असतो? तर तो जनतेसाठीच ना' या निष्कर्षाने ती मोहरते. 'आझाद काश्मीर की जंग' ही मोहीम हाती घेते. तिच्या या कार्यास अखेरी तिचे अब्बू व मुलगी दिलशादही सामील होण्याचा निर्णय घेतात. राजकारणाचा स्पर्श असणाऱ्या एका कणखर स्त्रीचा चेहरा या कथेस आहे. अशा स्त्रियांची गरज राजकारणास हवी हे अनमान योग्य वाटते. तिच्या कणखर, करारी बाण्याचे एक तेजस्वी रूप आढळून येते. धर्मापलीकडे देशाचा विचार करणारी ही स्त्री आहे.
 कमल नावाच्या मनोगंड - मनोविकारांची शिकार झालेल्या एका अनाथ मुलीची 'स्वत:लाच रचीत गेलो' ही अनोखी कथा आहे. मोठ्या घरची माणसे संदीपला बहीण असावी या हेतूने एका वर्षाची असताना कमलला घरी आणतात. मात्र जेव्हा तिला ती अनाथाश्रमातील आहे हे कळते तेव्हा तिला मनोगंडांनी घेरले जाते. अपराधी वाटते. पण डॉक्टरांच्या 'शॉक थेरपी' ने ती बरी होते. या वेदनेवर उपाय म्हणून तिची मूळची संगीताची आणि कवितेची आवड उफाळून वर येते. त्यामुळे तिला जीवनानंद गवसतो. जरी श्रीकांतने तिला अव्हेरले असले तरी त्याचा गर्भ तिच्या उदरात विकसित होतो आहे. या आनंदाने ती खूश आहे. जरी ती अनाथ असली तरी ते दु:ख पचवून नारायण सुर्वेच्या 'सूर्यकुलातील मी एक' असे स्वत:ला समजते. आणि नव्या निश्चयाने जीवन जगण्यास उभी राहते. जीवनाचा समर्थ अर्थ शोधणारी ही स्त्री आहे. तर 'नेव्हर सी यू अगेन'मधील सिस्टर अॅग्नेस ही एक प्रेरणादायी माताच आहे. इनामदारांच्या संस्कारशील घराण्यातून कुरूप, वेडाविदा असणारा संजय स्वत:च्याच आई-वडिलांकडून हेटाळला जातो. तो एकाकी बनतो. त्याला मनोरुग्ण ठरविले जाते. तेव्हा त्याच्यातील चित्रकाराला हेरून सिस्टर अॅग्नेस त्याची प्रतिभा फुलवते. स्वत:चा दुसरा वारलेला मुलगा लुई मानते. तिचा टोनीही मरतो तेव्हा ती शोकाकुल होते. त्यावेळीही संजय तिच्या आधारास जातो. ती त्याचा मुलगा म्हणून स्वीकार करते. आईपणाचे उदात्त नि उन्नत रूप या कथेतून विकसित झालेले आढळते.

 'गद्दार' ही सर्वात प्रभावी आणि भारतीय स्त्रीच्या मूळ रूपाची प्रचिती देणारी कथा आहे. बिल्कीसबी नावाची एक मुस्लीम स्त्री आहे. तिच्या पती-विषयीच्या निष्ठा व्यक्त झाल्या आहेत. धर्मांध राष्ट्राध्यक्षांच्या हुकूमशाहीचा, दहशतीचा बळी म्हणून लतीफला 'देशद्रोही' म्हणून भर चौकात गोळ्या घालून मारले जाते. प्रेताची 'गद्दार' म्हणून अवहेलना - विटंबना केली जाते. त्यावेळी तिच्या घरातील सर्वजण प्रेतावर धुंकणे, लाथ मारणे अशी निषेधात्मक कृत्ये करतात. पण बिल्कीसबी वरवरचा

९४ □ अन्वयार्थ