पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीच्या अलक्षित जीवनाचे एक अंग स्पष्ट होते. तिच्या रूपाचे दर्शन प्रस्तुत लेखात सादर आहे.
 

॥२॥

 'अंतरीच्या गूढगर्भी' हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा दुसरा कथासंग्रह आहे. 'अंतरीच्या गूढगर्भी' मधील स्त्रीरूपे ही गुंतागुंतीची असली तरी जो स्त्रीचा आत्मभाव असतो तोच या कथांचा केंद्रबिंदू आहे. अबोध मनातील काही सूक्ष्म स्पंदनेही केंद्रित झाली आहेत. भावनेचा अत्युच्च कोटीचा उत्कट आविष्कार या स्त्रियांच्या ठायी आढळतो आहे. परस्पर नातेसंबंध हे किती नि:स्पृह, अतूट आहेत याचीही एक मीमांसा करता यावी इतकी समरसता या कथांत आढळली आहे. काव्यात्म अनुभव हे सहजपणे व्यक्त झाले आहेत.
 या संग्रहातील सर्वोत्तम कथा ही 'मी किलिंग' ही वाटते. या कथेची नायिका ही अत्यंत 'प्रिय लेखिका' म्हणून 'बालविश्व' च्या बालवाचकांमध्ये प्रसिद्ध आहे. ती त्यांची प्रेरणा आहे. पण नायिकेच्या प्रतिभेचा आविष्कार म्हणून मा. नंदू हा साहसीवीर मानसपुत्र तिने उभा केला आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनात पूर्वी प्रेमात फसल्यामुळे ती एका पुत्राला जन्म देते. जन्मत:च त्याची मानसिक, बौद्धिक वाढ खुंटली आहे. तो धगुरडा झाला तरी गोष्ट सांगण्याचा अट्टाहास धरतो. त्यातून तिला लेखनाची प्रेरणा मिळाली आहे. प्रत्यक्षात बंडूचा 'मर्सी किलिंग' ने मृत्यू घडवून आणावा हाही विचार तिच्या मनात डोकावतो व ती अस्वस्थ होते. पण विधाताच तापाचे निमित्त साधून त्याला हिरावून नेतो. तेव्हा तिचा मानसपुत्र असणाऱ्या नंदूचा ती जाणून बुजून मृत्यू घडविते. अतिशय उंचीला पोहोचलेली ही कथा स्त्रीच्या मनोव्यापाराचे नेटके विश्व उभे करते. आईच्या मातृहृदयाची अगतिकता, तिच्या वेदना नि हे मातृरूप अगाध, अगूढ असल्याचे आढळते. आईचा एक नवा चेहरा हे या कथेचे एक सूत्र आढळते. काव्यात्म अनुभूती देणारी 'राधा' ही कथा एक मोक्याची कथा वाटते. पु. शि. रेगे यांच्या 'राधा' या त्रिधा-राधाचा काव्यात्म लघुपटाचा बंध या कथेत आला आहे. या कथेतील नायिका 'कविता' ही आहे. भाई तिच्या भेटीसाठी स्वत: निर्माते असूनही आतुरले आहेत. राधेची भावविभोरता या कथेतील आणि चित्रपटातील 'कविता' या नायिकेच्या भूमिकेत सामावली आहे. पण ही नायिका प्रत्यक्षात विरहिणीचे रूप घेऊन वावरते आहे. भाईंना वाटते ती आपल्यावर नाराज झाली आहे. परंतु याउलट तीच या गोविंदाच्या प्रेमासाठी आसुसली होते. प्रेमाचे अभिजात रूप घेऊन ती प्रत्यक्षात 'राधा' म्हणूनच वावरणारी आहे. इथे स्त्रीमनाची कोवळीकता आढळून येते. याउलट 'रात्र' कथेतील नायकाची

अन्वयार्थ □ ८९