पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपदर्शन

विष्णू नारायण पावले

   

॥१॥

 लक्ष्मीकांत देशमुख हे भारतीय प्रशासनातील एक सनदीदार अधिकारी. महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांच्या एकूण लेखनाचा आवाका पाहाता मानवी जीवनासंबंधी, विविध जातसमूहांविषयी अतिशय तीव्रतर आणि अधिक संवेदनशील लेखन केले आहे. आपल्या लेखनाचा राष्ट्रीय स्वर नेहमी त्यांनी ठेवला आहे. तसेच राज्य, प्रदेश व राष्ट्रीय प्रश्नांविषयी जीवनाविषयीचा धांडोळाही घेतला आहे. जिल्हास्तरावरील प्रशासनाच्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी कार्यालयीन कामकाजात विविध समस्या घेऊन येणारी माणसे, त्यांचे प्रश्न व त्या प्रश्नांवर काढलेला तोडगा हा त्यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा दुवा आहे. एकूणच लेखनाच्या बाबतीत प्रशासनात त्यांच्यामधला अधिकारी जेवढा सजग आहे तेवढाच त्यांच्यातील लेखकही आहे. म्हणूनच लोकशिक्षकाची एक समर्थ भूमिकाही त्यांच्या ठायी आहे. अनेकविध विषयसूत्रांचा मागोवा घेताना या दोहोंचा (समाज व प्रशासन) सुमेळ त्यांनी साधला आहे. भोवतालाकडे पाहणारी त्यांची दृष्टी अधिक गहिरी आहे. परंतु ती पोकळढोकळ वस्तुनिर्देश करत नाही तर गाभ्यालाच हात घालते. एकूण त्यांच्या लेखनरूपाचा एक उच्चतम आविष्कार ते साक्षात उभा करतात.

 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथेचे दुसरे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या कथांमध्ये कामगार, मजूर, कष्टकरी, गृहिणी ते खेळाडू, राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या स्त्रिया आणि विविध नोकरीधंदा करणाऱ्या अलक्षित स्त्रियांचे विश्व साकारले आहे. महाराष्ट्रामध्ये स्त्री दाक्षिण्याची भूमिका चालत आलेली असताना जगण्याच्या वाटा धुंडाळणाऱ्या कर्तबगार, निराधार नि निरापराध अशा चौफेर परंतु सक्षम स्त्रियांचे रूप प्रकट झाले आहे. 'कथांजली', 'अंतरीच्या गूढगर्भी', 'पाणी! पाणी', 'नंबर वन', 'अग्निपथ' आणि 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या सहा कथासंग्रहांमधून

८८ □ अन्वयार्थ