पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पत्नी ही प्रारंभी नवीन लग्न झाल्यानंतर एका धुंदीत वावरणारी वाटते. पण जेव्हा तिला आपला नवरा रोज रात्री बेडकांना धरून प्रयोगशाळेत विकण्याचा धंदा करतोय हे समजते तेव्हापासून ती शृंगारत होत नाही. तिच्या साऱ्या चेतना - उत्तेजना त्या किळसवाण्या स्पर्शाने बजवल्या आहेत. नायकाची पत्नी ही स्वप्नील आयुष्याचा चुराडा झाल्याने व्यथित झालेली स्त्री आहे.

 अर्धस्फुट मानवी भावनांची दुसऱ्या बाजूची स्त्रीरूपेही या संग्रहात आढळतात. 'जोकर' या कथेमधील लीना तो छोटू विदूषक बुटका आहे म्हणून त्याच्याकडे हीणत्वाने पाहणारी आहे. त्याची हेटाळणी करणारी आहे. सामान्य जोकराने त्या सौंदर्यवतीची अभिलाषा धरल्यामुळे ती त्याच्यावर खट्ट होते. छोटूच्या स्वप्नांचा बिलोरी आरसा फुटतो. तर 'हे खेळ मनाचे सारे' मधील डॉक्टर असणाऱ्या नायकाची आई शहरात आली आहे. तिच्या पतीचे निधन झालेले आहे याचा तिला अजूनही विसर पडलेला नाही. त्यामुळे शहरात तिला मोकळेपणाने वावरता येत नाही. मात्र शेजारच्या मास्तरांचे डोळे सातत्याने पाठलाग करताहेत या भयाने ती ग्रस्त आहे. सत्त्वशील आणि सात्त्विक परंतु चौकटीबाहेरचे जग पाहिले नसलेल्या स्त्रीच्या मनाची अवस्था चित्रित केली आहे. धर्म - संस्कार, चालीरीतींचा कोष तिच्या मनाभोवती अदृश्यपणे घट्ट विणलेला आहे. या परिणामाची एक भावनात्मक अभिव्यक्ती ही या स्त्रीमनाचे कथारूप आहे. हे स्त्रीरूप आहे. 'माझे अबोलणेही' ही एक सुंदर प्रेमकथा वाटावी इतकी सहज अवतरली आहे. शब्दकळेचे आपसूकपणे व्यक्त होणारे नमुने रिचवणारी ही कथा आहे. विद्याच्या मनस्वी पण बौद्धिक स्वभावाचे, लाघवी व्यक्तिमत्त्वाचे विशेषत्व नायकाच्या तोंडून व्यक्त होते आहे. एकाच मार्गदर्शकाकडे संशोधनाच्या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन जीव पुन्हा परस्पर विभागले जातात. दोघांमधल्या पत्रसंवादाला अचानक ओहोटी लागते. विद्याची पत्रातील भाषा ही ओढ, आपुलकी न दाखवता अगदी वरवरचे अनुमान व्यक्त करते तेव्हा नायक अस्वस्थ होतो. थंड व मितभाषी विद्या नायकाचे मित्र सांगतात त्याप्रमाणे त्याच्या आर्थिक बाजूकडे पाहते. आजच्या युवतींच्या मानसाचे विद्या ही प्रतिनिधित्व करणारी आहे. मैत्रिणीच्या रूपाचे हे वेगळे अंग उत्तम शब्दकळेने साकारले आहे. तर 'सृजन कसा तडफड करी' कधील गुरू - रीटा या नात्याचेही भावबंध अनंताच्या पोकळीतले (स्त्री-पुरुष) प्रकृती - पुरुषाच्या अद्वैताचे चिंतन मांडणारे आहेत. इथेही स्त्री हाच चिंतनाचा विषय झालेला आढळतो. स्त्रीमनाचा चमत्कृतीशील आविष्कार रिटाच्या वर्तनातून, तिच्या बोलण्यातून अभिव्यक्त होतो. सृजनाचा सहसंबंध हा स्त्रीच्या निर्मितीप्रक्रियेशी जोडला आहे. या कथेला स्त्रीत्वाचे आदिम पदर लाभले आहेत.

९० □ अन्वयार्थ