पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माध्यमातून झाली. हा नववसाहतवाद बळकट करणाराच महाप्रकल्प होता याचा उलगडा आजवर कुणी केलेला नाही. त्यामुळेच कथांच्या जोडीला परिशिष्टात बिगर कथा non-fiction गद्य मजकूर जोडण्याची कारणे लेखकाला देणे भाग पडले आहे. हा कालबाह्य, नव समीक्षेच्या मराठीतील जातियीकरणातून आलेल्या वर्चस्वाचा परिणाम आहे. रूपवादी समीक्षक या लेखनाला कथाच म्हणणार नाहीत, हे भय त्यांच्या 'मनोगता'त जागोजागी व्यक्त झाले आहे. लेखकाने स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येचा अभ्यास कसा केला आणि त्यावर कसे उपाय शोधले हे सांगून पुढे म्हटले आहे :
 प्रस्तुतचे पुस्तक हे एकाच वेळी ललित (ficition) तसेच ललितेतर (non-ficiton) आहे. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' पुस्तकात अशी त्याची सांधेजोड का मला घालावीशी वाटली? कोणत्याही समीक्षक फूटपट्टीचा आधार न घेता मी म्हणेन की, आठ कथांमधून समाजाला मुलगी नको हे जीवनानुभूतीच्या अंगाने कालात्मकरीत्या आलं आहे, तर त्याची भारतातली जास्तच दाहकता समग्रतेत जाणवण्यासाठी हे लेख जरुरी आहेत. केवळ कलावादी म्हणतात तसे वाचकाचे निखळ रंजनच लेखकाने केले पाहिजे, असे मी मानत नाही. प्रबोधन व विचार-प्रवणतेची जोड देता आली तर साहित्यकृतीला नवे आयाम मिळू शकतील. कथेचा रसभंग करीत त्यात प्रबोधन करणारी आकडेवारी दिली तर कथेच्या कलात्मक सौंदर्यास बाधा येईल, म्हणून या कथांमध्ये त्याला भरपूर वाव असून मी कलात्मक तटस्थतेने ते टाळायचा प्रयत्न केला आहे... (मनोगत)
 मुळात कलावाद्यांच्या वसाहतिक संस्कारातून लेखक पुरेसा मुक्त झालेला नाही. त्यांनी आकडेवारी खरोखर दिली असती तर तो एक उत्तराधुनिक तंत्राचा प्रयोग ठरला असता. अर्थात, वाचक व संपादक - प्रकाशकांना तो पटला - पचला नसता, हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. मात्र अठराव्या शतकात डॅनियल डिफोने 'रॉबिन्सन क्रूसो'मध्ये आणि जोसेफ स्टर्नने 'ट्रीस्टम शन्डी' मध्ये अनुक्रमे बाजार, किराणा मालाच्या याद्या, खर्चाचा हिशेब आणि पूर्ण काळी पाने, बोटाची चित्रे, रेखाकृती वगैरे कादंबऱ्यात घुसडल्या होत्या. तेव्हा ते प्रयोग गाजले होते. मराठी साहित्य व लेखकाच्या कल्पनेचेच नियमन संस्कृती कशी करते या सिद्धान्ताच्या आधारे देशमुखांच्या कथांचा अधिक चांगला अभ्यास होऊ शकेल.

 पुन्हा एकदा पुष्पा भावे ‘अत्यंत चिकित्सक व परखड' परीक्षणात काय

अन्वयार्थ □ ८३