पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगवेगळ्या स्वतंत्र पूर्व संहिताच असतात. त्यांना पूर्वसंहिता epi-texts म्हणतात. त्या मुख्य संहितेकडे वाचकांनी कसे बघावे याची दिशा दर्शवित असतात. म्हणजे एखाद्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंपण, पटांगण, गेट, उंबरठा, परिसर व परर्ड अशा बाह्य संहिता घराच्या चिन्ह व्यवस्थेची थोडीबहुत पूर्व कल्पना देतात, तसेच हे असते. कधी कधी दारात सुंदर तुळशीवृंदावन आणि मध्य घराच्या कोपऱ्यात काळ्या पैशाचा गुप्तसाठा अशाही रचना असू शकतात. आत एक, बाहेर दुसरे असा प्रकार देशमुखांच्या लेखनात आढळत नाही. 'मनोगतात ते प्रांजळपणे लिहितात,
 गेली दोन वर्षे 'सेव्ह द बेबी गर्ल - कन्या वाचवा' या अभियानात मी बांधिलकी मानून काम करताना जे अनुभव आले, त्यातून या आठ कथा साकार झाल्या. त्या एकाच विषयाशी आधारित आहेत. तो विषय म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या व त्याचे लहान मुले, पत्नी - स्त्रिया आणि समाजावर होणारे परिणाम... हा तिसरा थीम बेस्ड कथासंग्रह सादर करून एक वेगळी वाङ्मयीन हॅट ट्रिक मी केली आहे. त्याची वाङ्मयाचे अभ्यासक व समीक्षकांनी नोंद घ्यावी अशी अपेक्षा आहे.
 आपण हा ललित लेखनाचा प्रयोग करीत आहोत. केवळ सामाजिक प्रचाराचे साधन म्हणून या कथा रचलेल्या नाहीत - हा दावा करताना पुढे लेखक म्हणतो,

 या सर्व आठ कथांमधून मी विविध अंगाने स्त्रीभ्रूणहत्येवर प्रकाशझोत टाकला आहे. समाजाला मुली का नको आहेत हा प्रश्न मी कलात्मकतेच्या परिघात, ललित शैलीत पण पोटतिडकीने मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यातला आशय गडद व्हावा म्हणून कथनशैलीतही काही प्रयोग 'लंगडा बाळकृष्ण' व 'केस स्टडीज' या कथांमध्ये केले आहेत. या कथा डॉक्यूमेंटरी अथवा अहवाल या गद्य प्रकारात डावलल्या जातील याचीही जाणीव लेखकाला आहे. १९३५ मध्ये शं. त्र्यं. शेजवलकरांनी सुखटणकरांच्या 'सह्याद्रीच्या पायथ्याशी' या 'ग्रामीण' कथासंग्रहाला फार अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली होती. तेव्हा लेखकाने गोव्यातील व ग्रामीण बोलीतील काही शब्दांची सूची शेवटी जोडली होती. तेव्हा आपलीच खेडी व समाज आपणाला नीट माहीत नसतो. त्यांचा परिचय नागर वाचकांना करून देण्यासाठी लेखकाने नकाशे, चित्रे, टिपणे वगैरे कथा संग्रहात द्यावेत असे मत शेजवलकरांनी परखडपणे मांडले होते. पण पहिल्या महायुद्धानंतर अँग्लो-अमेरिकन महाप्रकल्पातील 'विश्व साहित्य आणि सौंदर्यानुभव' या आधुनिक सौंदर्यशास्त्राची व 'नव' समीक्षेची आयात मढेकरी

८२ □ अन्वयार्थ