पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या भिन्न भिन्न प्रतिक्रियांसह लेखकाने शब्दबद्ध केली आहे. शेवटी विद्यार्थ्याचं मथित सार, "इथूनतिथून साऱ्या राजकीय व सामाजिक जीवनाला भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसने विळखा घातलाय, नथिंग विल हॅपन धिस कंट्री - हॅज रिअली नो फ्यूचर अॅटलिस्ट फॉर गुड अँड ऑनिस्ट पीपल" असे व्यक्त झाले आहे.
 जिथं राष्ट्र निर्माण करणारे युवक निवडले जातात त्या एम. पी. एस. सी. मध्ये असा गोंधळ असेल, तर म. न. पा. कडून काय अपेक्षा करावी?
 'अग्निपथ'मध्ये महानगरपालिकेतील संघर्ष ध्येयनिष्ठ कमिशनर विरुद्ध लोकप्रतिनिधी व संशयकल्लोळ निर्माण करणारे पत्रकार असा आहे. कमिशनरांचा मित्र जय, पत्रकार प्रणव जेटली इ. ध्येयवादी व निर्भय जीवन जगणाऱ्यांमुळे कथेची वीण घट्ट पकड घेणारी झाली आहे. एका सच्च्या अधिकाऱ्याला महानगरपालिकेमध्ये प्रमाणिकपणे काम करणं किती अवघड झालं होतं त्याची तीव्रता कमीशनरच्या खालील स्वगतातून लक्षात येईल.
 'इथल्या लोकप्रतिनिधींना विकासाचं काही देणं घेणं नाही, तर मी का एवढा जीव पाखडत आहे? माझं विवेकी व आदर्शवादी मन उत्तर द्यायचं, 'हे तुझं कर्तव्य आहे. शहर विकासासाठी तुला हे सारं केलं पाहिजे. इथल्या मूक, सोशिक जनतेसाठी. हे तर तुझे प्रोफेशनल इथिक्स आहे.' हा निर्धार या कथेतून संप्रेषित होतो. 'हिरा जो भंगला नाही' ही कथाही शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला वाचा फोडणारी आहे. संस्कारी अप्पा ग्रामीण स्त्रियांच्या विकासासाठी एक शिक्षण संस्था चालवतो. त्याच परिसरात अनैतिक मार्गाने सपकाळ शिक्षण सम्राट होतो आणि अप्पासारख्या आदर्शवादी, स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीची पैशासाठी अडवणूक केली जाते. तंग येऊन शेवटी अप्पाला लाच द्यावी लागते. अप्पा हे विवश होऊन करतो. तो म्हणतो, “हा पलायनवाद नाही की भीरुपणा नाही. पण आपली शक्ती पत्थरावर डोकं फोडून बर्बाद करायची नाही असं मी ठरवलं आहे.'
 निसर्गाच्या लहरीवर चढउतार झेलणाऱ्या व पुराच्या वेढ्यात वारंवार ग्रस्त होणाऱ्या तामुलवाडीच्या रामभरोसे लोकांची करुण कहाणी 'भव शून्य नादे' वाचायला मिळते. या कथेत दैववादी, नियतीवादी मोरया गोसावी, जो अध्यात्माच्या बळावर लोकांची दु:खं निवारण्यासाठी स्वत:ला समर्थ समजून जगत असतो. अभियंता अक्षय योगायोगाने तामुलवाडीच्या पुनर्वसनाच्या संदर्भात भयावह पावसात तेथे आलेला आहे. अक्षय तर्कशुद्ध विचार करणारा, संघर्षशील व सगळ्या मानवी समस्यांची उत्तरं भौतिक जगात शोधारा आहे. तो म्हणतो, ".......जन्माला आला त्याला किमान भौतिक सुखसुविधा मिळाली पाहिजे. ती त्याला मिळत नाही, कारण आम्ही प्रशासक व आमच्यावर अधिकार गाजवणारे राज्यकर्ते नालायक

अन्वयार्थ ६५