पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संबंधित आहे. धर्म आणि कुटुंबनियोजनाचा तसा काहीच संबंध नाही. परंतु काही लोक खऱ्या हितावह प्रबोधनाच्या अभावी धर्माच्या नावाने मानवी कल्याणाच्या योजनांना ‘विरोध करून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात गतिरोध आणतात. या कथेत मुलं आणि दारिद्र्याला जन्म देणारी गलितगात्र विवश नायिका अमीनाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रय्तन लेखकाने केला आहे.
 मंत्र्याच्या आदेशानुसार दुष्काळाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या पथकांचे असली रूप प्रकट करणारी 'दोरा' ही कथा. पेपरची रायवल्सी विसरून दारू, सिगारेट आणि अश्लील जोक्समध्ये हरवलेल्या पत्रकारांना ना दुष्काळाशी देणे घेणे ना लोकशाहीशी. ईप्सिताविषयी काडीची आस्था नसणारे हे पत्रकार तुमडी भरून घेतात आणि मालक सांगेल तेवढंच आणि तसंच बोलतात आणि कळकळीच्या ध्येयनिष्ठ पत्रकाराला मूर्खात काढून दफा होतात. लोकशाहीच्या आतून किडलेल्या खांबाचे देशमुखांनी घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.
'दास्ता ए - अलनुर कंपनी' ही कत्तलखान्यावरची कथा. कंपनीच्या चाऊसच्या सांगण्यावरून स्वार्थांध पत्रकार दिनेश सावंत दुष्काळात गुरांची छावणी चालवणाऱ्या भिडे गुरुजीविरूद्ध बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या देतो. या बातम्यांचे पर्यवसान छावण्या बंद पडण्यामध्ये होते. विरोधाचे कारण काय, तर भिडे गुरुजी हे संघ प्रचारक आहेत. गुरांची निगा राखणं, त्यांना पुष्ट करणं हे उद्दिष्ट पूर्ण होत असेल, तर काम करणारा कोण आहे ही बाब महत्त्वाची नाहीच! केवळ स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी पत्रकार दिनेश सावंत गुरांच्या छावण्या बंद करतो व दास्ता ए - अलनूर कंपनीच्या चाऊसच्या बेभाव, व भरपूर ढोर मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. कंपनी ती शिफ्टमध्ये चालू लागते. मुंबईतून अलनूर साहेबांकडून चाऊसला अभिनंदनाचा फोन येतो. अल्तमश आणि हयातखानला दहा हजार रुपयांचा एक्स ग्रेशिया मंजूर होतो.
 गुणग्राहकता, विवेक आणि आत्मपरीक्षणाचा अभाव असेल तर किती हानी होऊ शकते हेच दिनेश सावंतच्या द्वेषमूलक पत्रकारितेतून सिद्ध झाले आहे. ___'अगिनपथ' या संग्रहात विषयाच्या दृष्टीने बरेच वैविध्य आहे. 'लाईफ टाईम'चा फॉच्यून, अग्निपथ, हिरा जो भंगला नाही इ. कथा विविध क्षेत्रातील भ्रष्टाचारावर बेतलेल्या आहेत.
 'लाईफ' टाईमचा ‘फॉर्म्युन' ही कथा विद्यार्थी आणि सूर्यवंशी सरांच्या संवादातून आकाराला येते. एम. पी. एस. सी. अंतर्गत भ्रष्टाचार हे या कथेचे मूळ आहे. सारी यंत्रणा वेठीस धरून एक डी. आय. जी. आपल्या तीन मुलांना एकाच बॅचला डी. वाय. एस. पी. करतो, आणि अभ्यासाच्या बळावर प्रामाणिकपणे उत्तीर्ण होऊ पाहणारे सगळे विद्यार्थी संतप्त होतात. त्याची कोंडी, त्यांची घुसमट
६४ अन्वयार्थ