पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फिगर' असतात. समाजमनात त्यांच्याविषयी एक विशिष्ट प्रतिमा असते. त्यामुळे त्यांच्या खासगी - वैयक्तिक व्यवहाराचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनात; करिअरवर उमटत असतात. अशा अंगाने ही कथा खेळाडूंमधील ‘मानवी मन', त्यांचे 'मातीचे पाय' शोधण्याचा प्रयत्न करते.
 रनिंग, क्रिकेट, बॅडमिंटन, जलतरण, शूटिंग या क्रीडा प्रकारांच्या निमित्ताने त्या - त्या प्रकारांतील सूक्ष्म तपशील कथाकाराने मांडले आहे. क्रीडाक्षेत्राशी समरूप झालेला खेळाडू आजूबाजूच्या समूहभावाला बाजूला सारून 'लक्ष्या' वर केंद्रित होतो. मात्र त्याच्या भाववृत्ती, सहजप्रवृत्ती, त्याचा लहरी स्वभाव जेव्हा उफाळून येतो तेव्हा त्याच्या हातून काही प्रमाद घडतात. अशा समयी त्याचे यश बाजूला पडते आणि चाहत्यांच्या मनावर 'नायक' म्हणून विराजमान झालेला तो नंतर 'खल' नायक ठरतो. क्रीडाविश्व आणि मानवी भावविश्व यांची संमिश्र अशी गुंतागुंत कथाकाराने प्रकट केली आहे.
 'फिरूनी नवी जन्मेन मी' ही या संग्रहातील ग्रामीण भागातील पाथरवट समाजातील मुलीच्या जीवघेण्या संघर्षाची, क्रीडाक्षेत्रात तिला कराव्या लागणाऱ्या सामन्यांची कथा आहे. मीना ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावपटू आहे. मात्र आशियन गेम्सच्या स्पर्धेत तिला 'लिंग निदाना' (जेंडर टेस्ट) ला सामोरे जावे लागते. आणि त्यात 'त स्त्री नाहीस' असे तिला सांगितले जाते. तेव्हा धावण्याच्या शर्यतीत अव्वलस्थानी असणारी मीना कोलमडते आणि 'आपण स्त्री आहोत' हे सिद्ध करण्यासाठी जीवतोड मेहनत करते. मात्र तिची स्पर्धक विरोधक सानिया वेगळा पवित्रा घेऊन तिला सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती आत्महत्येस देखील प्रवृत्त होते. स्त्री म्हणून होणारी कुचंबणा, घुसमट वेगळी आणि स्त्री असूनही पुरुषी गुणधर्म अधिक असल्यामुळे स्त्री नाही म्हणून वाट्याला येणारी वेदना त्यापेक्षा अधिक जीवघेणी, आणि त्यासंदर्भातील शह-काटशह यांचा प्रत्यय इथे येतो.
 'बंद लिफ्ट' ही क्रिकेट जगतावर अधिष्ठित असलेली एक कथा आहे. कथेच्या वाचनाने क्रीडा क्षेत्रातील प्रत्यक्षातील काही संदर्भ वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. हॅम व सॅम या दोन बालपणापासूनच्या एकत्र करिअर घडवून पाहणाऱ्या मित्रांतील नात्यांची आणि विशेषत: हॅमची शोकान्त अशी कहाणी आहे. सॅम उच्चवर्णीय समाजाचा. तो आपला खेळ, फॉर्म, खासगी जीवन हे सारे सांभाळून पुढे पुढेच जात राहतो. मात्र हॅम दलित समाजातील. तोही सॅम इतकाच खेळण्यात माहीर. क्रिकेट जगतात स्वत:चे स्थान असलेला आहे. परंतु खासगी जीवनातील वर्तन समाजनियमांना धरून न करणे, अभावग्रस्ततेमुळे उपभोगाच्या

अन्वयार्थ ५७