पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतात. 'बायजा'सारख्या स्त्रियांचा छळ जिवंत असताना तर सुरू असतोच, मात्र मेल्यानंतरदेखील त्यांना त्याला सामोरे जावे लागते. 'मृगजळ' मधील रखमा आणि 'उदक' मधील प्रज्ञा या दोघी दलित तरुणी शिक्षित आहेत. मात्र पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात त्यांच्या शरीराचा वापर काही जण करून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या धीराने तोंड देऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्याचे ठरवतात.
 'भूकबळी' ही या संग्रहातील एक महत्त्वाची आणि सर्वार्थाने दुष्काळी समाजाची प्रतिनिधी ठरावी अशी कथा आहे. सामान्य, हातावर पोट असणाऱ्या दलित कुटुंबाची दुष्काळात सर्व बाजूने कोंडी होऊन कशी होरपळ होते त्याचे साद्यंत शोकात्म असे चित्रण आले आहे. या कथेतील ठकूबाई ही नैसर्गिक अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे भूकबळी ठरत नाही, तर शासन-प्रशासनाच्या गलथानपणामुळे ती बळी गेल्याचे दिसते. रोहयोची कामे असूनही या कुटुंबाची होणारी फरफट, कामाचा मोबदला म्हणून मिळाणाऱ्या धान्याच्या काळाबाजार, ते देणाऱ्या दुकानदारांची मनमानी, मजूर संघटनांची अपप्रवृत्ती, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांची भ्रष्ट प्रवृत्ती, संवेदनाहीनता, अशा वेगळवेगळ्या घटकांच्या ताणामुळे ठकूबाईसारख्या महिला भूकबळी ठरतात हे इथे प्रत्ययास येते. तीव्रतर अशी सामाजिक समस्या कथाकाराने अतिशय संयतपणाने आणि तितक्याच कलात्मरीतीने हाताळली आहे.
 दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार ठरणारी जनावरे चारापाण्याअभावी सैरभैर होतात. पर्याय नसताना खुंट्यावर मरण्याऐवजी जो येईल त्याला जनावर बेभाव विकले जाते. अशा परिस्थितीत कत्तलखाने जोरात सुरू असतात. त्या संदर्भातील कारुण्यपूर्ण चित्रण 'दास्ता ए अलनूर कंपनी' या कथेतून आले आहे.

 बहुतांश ग्रामीण कथनात्म साहित्यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांची भ्रष्टता, बोथटता आलेली आहे आणि ते सत्यही आहे. मात्र या संग्रहातील काही कथांत सरकारी अधिकारी संवेदनशील, जनतेप्रति बांधिलकी असलेले, प्रसंगी आपल्या उच्चपदस्थांचा रोष ओढवून घेणारे असे आहेत.

॥३॥

  लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'नंबर वन' या संग्रहातील एकूण दहाही कथा क्रीडाक्षेत्राशी संबंधित आहेत. मानवी जीवनातील सहजप्रवृत्ती ह्या जशा अन्य क्षेत्रात कार्यरत असतात तशाच त्या क्रीडाक्षेत्रात देखील कार्य करत असतात, त्याचा प्रत्यय या कथांच्या वाचनाने येतो. क्रीडाक्षेत्रातील खेळाडू, क्रिकेटर ह्या ‘पब्लिक

५६ अन्वयार्थ