पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठी धावणे, आपल्या फॉर्ममध्ये सातत्य न टिकवणे आणि दलितत्वामुळे निवड समितीने आपपरभाव बाळगणे यामुळे तो या क्षेत्रापासून बाजूला फेकला जातो. आणि निराशेच्या, वैफल्याच्या गर्तेत अडकतो. परिस्थिती, नियती ह्या माणसाच उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या जशा कामी येतात तशाच बिघडण्याचीदेखील भूमिका बजावतात. याचा इथे प्रत्यय येतो.
 बेबी राणे ('रन बेबी रन') ही एक उत्कृष्ट धावपटू आहे. तिचे कोच - गुरू यांचा मानसिक-भावनिक आधार घेऊन उभी राहते. पुढे लग्न झाल्यानंतर पुरुषसत्ताक मानसिकतेचा पती मिळतो, त्यामुळे आपले करिअर तर थांबवावे लागतेच, मात्र प्रचंड मानसिक - शारीरिक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागते.
 'ब्रदर फिक्सेशन', 'दी रिअल हिरो', 'प्रयासे जिंकी मना', 'नंबर वन' यासारख्या कथा खेळाडूंमधील माणूसपण जपू पाहणाऱ्या. कधी त्यांच्यातील सहजप्रवृत्तींना अधोरेखित करणाऱ्या तर कधी महत्त्वाकांक्षा, खिलाडूवृत्ती यांचे देखील दर्शन घडवणाऱ्या अशा आहेत. 'शॉर्प शूटर' सारखी कथा अंडरवर्ल्डमधील शूटर भारताचा अव्वल नेमबाज कसा बनतो - त्याच्या हृदयपरिवर्तनाची काहीशी अतिरंजित वाटावी अशा स्वरूपाची आहे.
 कथांच्या निवेदनाला आलेला प्रवाहीपणा, कथानक सहज पुढे घेऊन जाण्याची क्षमता यामुळे या कथा वाचक सहजतेने, उत्कंठेने वाचतो. कथानक काहीसे परिचित - अपरिचिताच्या सीमारेषेवर वावरणारे. त्यामुळे वाचक डोक्याला फारसा ताण न देता पुढे काय होणार याविषयी अंदाज बांधायला लागतो. या खेळाडूंची मुमूर्षा आणि जिगीषा पाहून हरखून जातो. असे असले तरी ती कुठेही रंजनपर होत नाही. आपला कलात्म तोल ढळू देत नाही. मराठी साहित्याला क्रीडाक्षेत्र तसे अपरिचित नाही. मात्र अलीकडच्या काळात या क्षेत्रावर अधिष्ठित कथनपर साहित्य फारसे दिसून येत नाही. त्यादृष्टीने हा कथासंग्रह 'नंबर वन' ठरावा अशा स्वरूपाचा आहे.

॥४॥

 देशमुखांचा 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह अगदी अलीकडे, वर्षभरापूर्वी, प्रकाशित झाला. 'स्त्रीभ्रूणहत्या' या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू या निमित्ताने देशमुखांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत. स्त्रीभ्रूणहत्या ही समस्या गेल्या दोन दशकांपासून ज्वलंत उभी ठाकली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजधुरिणांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी अशी ही बाब आहे. ती एकाएकी उद्भवली

५८ अन्वयार्थ