पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समानधर्मी असे आहेत. ते दोघेही त्यांच्याविरोधात संघर्ष करू पाहतात; मात्र त्यांचा हा संघर्ष सुटा, एकल स्वरूपाचा ठरतो, तो सामूहिकतेचे रूप घेत नाही. त्यामुळे तो विद्रोहाच्या पातळीवर पोहोचण्याऐवजी तात्कालिक क्रोधाचे, संतापाचे रूप घेतो.
 ग्रामजीवनात सरंजामी जाणीव सूक्ष्मस्वरूपात अद्यापही रुजून असल्याचे काही कथांतून दिसून येते. ही सरंजामी मानसिकता आणि पितृसत्ताक व्यवस्था या दोघोंच्याही बळी ह्या स्त्रियाच ठरलेल्या आहेत. विशेषत: मराठा, मुस्लीम आणि ब्राह्मण समाजातील स्त्रियांना याची झळ अधिक पोहोचते. (दलित स्त्रियांचे दुःख त्याहीपेक्षा अधिक दुहेरी पातळीवरचे आहे). ब्राह्मण समाज शिक्षणामुळे ही मानसिकता बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. 'खडकात पाणी' या कथेतील ब्राह्मणाची सून सुनंदा हिच्या पायगुणाने दुष्काळग्रस्त आकाशवाडी-मध्ये पाऊस आला म्हणून गावकरी तिचे स्वागत करतात. तिच्या हस्ते कूपनलिकेची पूजा होते. संबंध गाव, तिचे कुटुंब आणि कथानिवेदक देखील तिच्याकडे आदराने पाहतात. मात्र मराठा व मुस्लीम समाजातील स्त्रियांची स्थिती नेमकी याच्या उलट आहे. घरंदाज, खानदानी म्हणवले जाणारे कुटुंब देशोधडीला लागते, तेव्हा रोहयोच्या कामावर जाण्याखेरीज गत्यंतर नसते. मात्र नवरा सरंजामी-वृत्तीचा असल्यामुळे अशा कामावर जाणे त्याला प्रतिष्ठेचे वाटत नाही. आणि तो स्वत:देखील जात नाही. 'बांधा' कथेतील गजरा आणि 'अमिना' मधील अमिना या दोघी अशा व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत. 'जगण्याची हमी' मधील कैकाडी समाजाच्या सारजाचे दु:ख वेगळ्या प्रकारचे आहे. तिचा नवरा गावचा पोलीस पाटील आहे. तो पाटलांची काम न करण्याची परंपरा पुढे चालवतो. त्यामुळे कुटुंबाची उपासमार होते. सारजाला धीराने पुढे होऊन काम करून जगण्याची हमी मिळवावी लागते.
 दलित समाजातील स्त्रियांच्या दुःखाचे अंत:स्तर अधिक गहिरे आणि दुहेरी स्वरूपाचे असे आहेत. दलित म्हणून सामाजिक विषमतेचा जाच जसा असतो; तसेच तिला कुटुंबात देखील दुय्यमत्व असते. 'कंडम' कथेतील निराधार बायजा पाण्यासाठी व्याकूळ होते. पाटलांची सून, जोशांची बायको म्हाताऱ्या बायजाला पाणी वाढत नाही. शिवाय दलितांसाठीची पाण्याची विहीर दूर असते. तहानेने व्याकूळ झालेली बायजा अंधारात सवर्णांच्या विहिरीवर जाते; आणि पाणी शेंदत असतानाच पडून तिचा अंत होतो. दुसऱ्या दिवशी विहिरीतील तिचे प्रेत पाहून सवर्णीय खवळून उठतात. विहीर बाटली म्हणून तिची शुद्धी करून घेण्याचे ठरवतात. पाण्याअभावी एका वृद्ध दलित स्त्रीचा मृत्यू होतो आणि सवर्ण शुद्धाशुद्धतेची, तर दलित तिचे प्रेत वाहून न्यावे लागणार म्हणून तेथून पळ काढण्याची भाषा

अन्वयार्थ ५५