पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी त्याच्या निवारणाच्या उपाययोजना ह्या संस्थात्मक शासकीय पातळीवरील असतात. त्यामुळे तेथे मानवी हस्तक्षेपास बराचसा वाव असतो. देशमुखांनी या निमित्ताने प्रस्तुत संग्रहातील कथांमधून दुष्काळासंदर्भातील राजकारण, राजकीय पक्षांची श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा, आपापल्या मतदारसंघात रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी धडपड, धान्य वाटपातील काळाबाजार, धरणाचे - नदीचे पाणी वरचेवर अडवणे, टँकरच्या पाणी पुरवठ्यातील दंडेलशाही, एका पाणवठ्यावर पाळली जाणारी जातीय विषमता, अन्न-पाणी न मिळाल्यामुळे गेलेले भूकबळी, जगण्याचे पाण्याचे मूल्य म्हणून काही अपप्रवृत्तीनी केलेला स्त्रियांच्या शरीराचा वापर, गरोदर महिलेला प्रसूतीसाठी पाणी न मिळणे, प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या सरंजामी वृत्तीच्या पुरुषांच्या बायका खडीकाम / रोहयोच्या कामावर जाणे आणि त्यांनी प्रतिष्ठाहनन होऊ नये म्हणून गावातच थांबणे - अशा विविध आशयसूत्रांना या कथा आविष्कृत करतात. देशमुखांची पूर्वीची कथा ही व्यक्तिनिष्ठि स्वरूपाची होती. या कथांनी तिला सामाजिक आशयाचे एक व्यापक परिमाण मिळवून दिले. आपल्या काळाची, विशेषत: दुष्काळाची, तीव्रतर स्पदंने देशमुख इथे टिपतात. आशयसूत्रांचे परस्परांशी असणारे संबंध, स्थळ - कालावकाशाची सलगता, पात्रांची कथांतील पुनरावृत्ती व विकासक्रम, प्रदेशाची भाषेची समानता अशा बाबींमुळे या कथा सुट्या सुट्या असल्या तरी कांदबरी सदृश अशा सलग कथानकाचा प्रत्यय वाचकास देतात.
 एकाच जिल्ह्यातील दोन तालुक्यात असमान पाणी वाटपामुळे सामान्य शेतकऱ्यांना जो जाच सहन करावा लागतो त्याविषयीचा अनुभव ‘पाणी चोर' या कथेतून येतो. महादू हा ऊसशेतीचा मालक. मात्र धनदांडगे शेतकरी त्याच्यापर्यंत पाणी पोहोचू देत नाहीत. त्यामुळे डोळ्यादेखत उभे पीक पाण्याविना जळून जाताना तो पाहातो. आणि दुसऱ्याच्या शेतावर ऊसतोड मजूर म्हणून त्याला काम करावे लागते. 'लढवय्या' कथेतील महादू कांबळे हा सैन्यातून निवृत्त होऊन गावी स्थायिक झालेला आहे. गावचा सरपंच त्याला शासनाकडून मिळालेल्या जमिनीत वरच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाझर तलावाचे नियोजन करतो; गावकऱ्यांना त्यांच्या विरोधी उभे करतो. महादू कांबळे आपल्या परीने अधिकाऱ्यांना-गावकऱ्यांना समजावतो. मात्र कुणीही त्याचे ऐकायला तयार नसते. तेव्हा तो हतबल होतो आणि आपल्या देशातील व्यवस्थेविरोधातच उभा राहण्याचा निर्णय घेतो. इतके दिवस बाहेरच्या, परकीय शत्रूशी लढलो आता घरभेद्यांशी लढणे आले, असे समजून सरपंचाच्या विरोधात उभा राहतो. ऊसतोड मजूर महादू व 'लढवय्या' मधील महादू कांबळे हे दोघे भिन्न जातींचे, वर्गांचे आहेत. परंतु त्यांचे शोषक मात्र

५४ अन्वयार्थ