पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूल्यनिर्णय घेते. त्यानंतर काही दिवसांतच बंडूला नैसर्गिक मरण येते. तेव्हा अगोदर मनात आलेल्या विचाराने ती बेचैन होते. आणि ही बेचैनी ती नंदू या कथामालिकेच्या बालवीराला 'मर्सी किलिंग' देऊन थांबवण्याचा प्रयत्न करते. माता आणि लेखिका या दोन्ही सृजनाच्या पातळ्या नैतिक मूल्यनिर्णयासंदर्भात कशा एकमेकींशी नाते सांगतात तर कधी एकमेकींवर प्रभाव टाकतात ते मांडले आहे. जीवन आणि कला यांचे विश्व कधी समांतरपणे; तर कधी एकमेकांत मिसळून पुढे जात असते. मात्र जीवनातील अस्वस्थता, वैफल्य वाढीस लागल्यावर ते संपवावे, की पुढे वाहते ठेवावे, असा मूल्यनिर्णय देण्याची वेळ येते, तेव्हा ती संवेदनशील व्यक्ती म्हणून जीवनाच्या बाजूने उभी राहते. मात्र जेव्हा नियती ते संपवते, तेव्हा तितक्याच प्रेमाने वाढवलेली कलाकृती देखील ती संपवते. या निमित्ताने कथालेखकाने जीवन व कला यासंदर्भात काही मूलभूत प्रश्न उपस्थित करून 'काव्यगत न्याया'वर जीवनव्यवहार प्रभाव टाकतो- त्याचे सूचन केले आहे.
 या कथासंग्रहातील 'राधा', 'हे खेळ मनाचे सारे' या दोन कथांतून निवेदनाच्या स्वरूपात काही प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. 'राधा' मध्ये सलग कथानिवेदन सुरू असताना मध्ये लघुपटाचे निवेदन आले आहे. तर 'हे खेळ...' मध्ये आलटून पालटून पात्रमुखी निवेदन तंत्र वापरले आहे. कधी धक्कातंत्राचा / कलाटणीचा देखील लेखक वापर करतो.

॥२॥

 मराठवाडा हा प्रदेश सतत दुष्काळाशी संघर्ष करत आला. या दुष्काळामुळे ग्रामजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. कारण नागरी जीवनाप्रमाणे तिथे केवळ मानवी जीवनच अस्तित्वात असत नाही; तर या मनुष्यसृष्टीबरोबरच जनावरे, अन्य पशुपक्षी, वनस्पती, शेतातील पिके या साऱ्या 'पर्यावरणीय अधिवासा'तील घटकांना दुष्काळाची झळ सोसावी लागते. मात्र दुष्काळ निवारणासाठी शासकीय स्तरावर ज्या उपाययोजना केल्या जातात. त्या प्राय: 'माणूस' हे एकक ध्यानी घेऊन; परंतु आजूबाजूच्या या निसर्गसृष्टीचा ते फारसा विचार करत नाही. त्यामुळे ग्रामजीवनात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवते.
 लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘पाणी! पाणी!!' (२००७) हा कथासंग्रह याच विषयाला केंद्रित करतो. १९९७ मध्ये हाच संग्रह 'उदक' या नावाने प्रसिद्ध झाला होता. दहा वर्षांनंतरदेखील 'तहानलेल्या महाराष्ट्राची कहाणी' (संग्रहाचे उपशीर्षक) आहे तशीच आहे. यातील बहुतांश कथा ह्या मराठवाडा प्रदेशातील असल्या, तरी काही मात्र परिसरातील वातावरणाला अधोरेखित करतात.

अन्वयार्थ ५३