पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥१॥

 'अंतरीच्या गूढगर्भी' हा सतरा कथांचा समावेश असलेला संग्रह शीर्षकाप्रमाणेच मानवी मनाच्या तळाशी दडून असलेला गूढभाव, सहजप्रवृत्ती, प्रेमविषयक शारीरीअशारीरी जाणीव, नात्यांची वीण, गतस्मृतींची कातरता व ओढ अशा मानवी मनाच्या भावावस्था आविष्कृत करतो.
 मुळात प्रेमभाव ही मानवी जीवनातील सहजप्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीची अनेक रूपे या कथांतून प्रकटली आहेत. 'राधा', 'स्वत:च्या मनाचा एक्सरे रिपोर्ट', 'अभिमान', 'माझे अबोलणेही' या कथांतून प्रायः मध्यमवर्गीय, शिकून नोकरी करणारा असा अविवाहित तरुण आलेला आहे. तो मुंबई, औरंगाबाद-सारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी विज्ञानात पदव्युत्तर, पदवी वर्गांसाठी शिकून परभणीसारख्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेत नोकरी करतो. मुळात तो संवेदनशील लेखकमनाचा आणि बहुश्रुत, अभिरुची संपन्न असा आहे. उच्च दर्जाच्या साहित्यकृती, कलात्म चित्रपट, नाट्य, चित्र यांसारख्या कलाप्रकारांत त्याला विशेष रुची आहे. या छोट्या गावी त्याला त्यांचा आस्वाद घेता येत नाही. शिवाय ज्या मैत्रिणींसोबत काळ व्यतीत केलेला असतो त्यांच्या आठवणी येथील एकांतवासामुळे (अर्थात त्याच्या दृष्टीने) अधिक उचंबळून येतात. तेव्हा त्यांच्याशी पत्रमाध्यमातून संवाद साधत आपली वेगवेगळ्या विषयांवरील मते, मतभिन्नता, कुटुंब, समाज, लग्न या सामाजिक संस्थांसंदर्भात भूमिका या अंगाने 'स्वगत' पर चर्चा प्राधान्याने या कथांतून आली आहे. या कथांतील नायिका ह्या नायकापेक्षा धीट, काही एक स्वंतत्र विचार नीटपणाने मांडू पाहणाऱ्या अशा आहेत. कधी काळाबरोबर तर कधी काळाच्या पुढेदेखील दोन पावले टाकून विवाह वा कुटुंब संस्थेविषयक वेगळा विचार मांडणाऱ्या अशा आहेत. नायक मात्र पुरुषसत्ताक पारंपरिक विचार करणारा, कुठलीही मोडतोड न करता आहे त्या व्यवस्थेत सगळी सुखे कशी मिळवता येईल त्या अंगाने विचार करणारा असा आहे. 'अभिमान' कथेतील कान्त व बीना हे याचे उदाहरण म्हणून नमूद करता येईल. एकत्र शिकणारे हे दोघे चांगले मित्र आहेत. मात्र बीनाची ध्येयकेंद्रितता, तिची स्वतंत्र विचारशैली, आर्थिक स्वावलंबन त्याला नको असते; तर एक पारंपरिक, कुटुंबवत्सल स्त्रीच्या तो शोधात असतो. या मतभिन्नतेमुळे ते दोघे एकत्र येणे शक्य होत नाही.
 जैविक गरजांचे समाधान हे अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाचे असते. या गरजांच्या पूर्तीसाठी व्यक्ती विविध मार्गांचा अवलंब करते. मात्र त्यांची जेव्हा पूर्ती होत नाही अथवा सामाजिक नियमनांमुळे त्या जेव्हा दबल्या जातात, तेव्हा त्या

अन्वयार्थ ४९