पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकृतीचे वा मनोविकारांचे रूप धारण करतात. 'बास्टर्ड' कथेतील पारधी समाजाच्या शेवंताचा नवरा बुळा, कर्तृत्ववान नसल्यामुळे ती नानासाहेब इनामदारांशी खुलेआम शरीरसंबंध ठेवते. त्यांच्यापासून तिला मुलगादेखील होतो. इनामदारांच्या मृत्यूनंतर ती पुन्हा अन्य पुरुषाबरोबर - महादजी पाटील - संबंध ठेवते. तिचा मुलगा बबन याला विरोध करतो. तेव्हा ती म्हणते, "आपलं समदं खुल्लम खुल्ला असतंया. अजून मी बुड्ढी नाय झाले. अजनू आग हाय इथं... म्या माझी जिम्मेदार हाय.” (बास्टर्ड, पृ. १७) ही शेवंताची वर्तणूक बबनला गैर, अनैतिक वाटते. मात्र तिला त्यात गैर काहीही वाटत नाही. एक प्रकारे आपली आदिम प्रेरणा, जैविक गरजच भागवतोय, असा शेवंताचा त्यापाठीमागे वर्तनभाव असतो.
 मात्र दुसऱ्या एका 'हे खेळ मनाचे सारे' या कथेत नेमके याच्या उलट घडते. निवेदक श्रीची आई नानी ही विधवा आहे. श्री लहान असतानाच वडील वारले. त्यामुळे आईला उभे आयुष्य एकाकी काढावे लागते. त्यांच्या शेजारच्या बंगल्यात विधुर असणारे मास्तर राहात असतात. त्यांच्याकडे नानींचे जाणे येणे असते. दरम्यान मास्तरांविषयी नानींना आकर्षण निर्माण होते. मात्र संस्कारशील पित्याची कन्या, वेदशास्त्रसंपन्न घराण्याची सून, डॉक्टर श्रीची आई - ही लेबले चिकटल्यामुळे मनातील भाव कुणाजवळ प्रकट करता येत नाही. त्याशिवाय सामाजिक नियमांचा, नैतिक मूल्यांचा प्रचंड दबाब असल्यामुळे असा विचार, कृती म्हणजे परंपरेच्या दृष्टीने 'वाकडे पाऊल' ठरणार असते. त्यामुळे ही सारी घुसमट, अतृप्त वासना मनातच दडून राहते आणि पुढे मनोविकृतीचे रूप धारण करते. आपल्या मनात आलेले परपुरुषविषयक विचार-विकार समाजभयापोटी आपले नसून ते आपल्या संदर्भात ते त्याच व्यक्तीचे आहेत. असा 'टाईप ऑफ प्रोजेक्शनचा' मनोविकार तिला जडतो. शेवंता व नानी या दोघींची तुलना केली तर दोघींचीही जैविक गरज पूर्ण झालेली नाही. त्यासाठी त्या पर्याय शोधू पाहातात. तेव्हा शेवंता करू पाहात असलेली पूर्ती ही तथाकथित सामाजिक विकृती ठरते; तर नानींची मनोविकृती ठरते. या दोघींच्या संदर्भात त्यांच्या मुलांचे वर्तनदेखील भिन्न स्वरूपाचे आहे. श्री स्वत: डॉक्टर, मनोविकार तज्ज्ञ असल्यामुळे आईला नीट समजून घेऊ शकतो; मात्र बबनला शेवतांचे वर्तन सामाजिक संस्कारांमुळे अनैतिक वाटते. जैविक गरजांना सामाजिक वर्तन आणि संस्कार कसे परावर्तित करतात, त्यांची 'कंडिशनिंग' करतात - हे इथे दिसून येते.
 'भुके'साठी, पर्यायाने जगण्यासाठी, करावा लागणारा संघर्ष 'रात्र' सारख्या कथेतून तीव्रपणे अधोरेखित झाला आहे. उच्चशिक्षित असूनही दिग्विजयला नोकरी मिळत नाही. तेव्हा गावातीलच महाविद्यालयाला विज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी बेडूक
५० अन्वयार्थ