पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लक्ष्मीकांत देशमुख यांचे कथालेखन



_______________________________________________
डॉ. केशव तुपे


 १९९० नंतर मराठी कथेचा प्रांत विविधांगांनी समृद्ध झालेला दिसून येतो. अनेक कथाकार आपापल्या वकुबाने या काळात लेखन करताना दिसतात. त्या त्या काळाची स्पंदने तातडीने अभिव्यक्त करण्यात कथा हा वाङ्मयप्रकार अग्रभागी असल्याचे जाणवते. जागतिकीकरणाचा रेटा, त्याचा समाजजीवनावर झालेला परिणाम, त्याद्वारा बदललेली सांस्कृतिक - सामाजिक परिस्थिती; बदलते, गतीशील समाजवास्तव, चैतन्यहीन; उद्ध्वस्त दुष्काळग्रस्त होत जाणारे खेडे, राजकीय क्षेत्रातील मूल्यहीनता, भ्रष्टप्रवृत्ती; धर्म - जात, भाषा - लिंग या विविध जाणिवांची टोकदार अस्मिता यांसारख्या अनेकविध आशयसूत्रांना कवेत घेण्याचा प्रयत्न अलीकडचे कथालेखक करत आहेत. लक्ष्मीकांत देशमुख हे याच काळातील दमदारपणाने कथालेखन करणारे एक महत्त्वाचे असे नाव आहे.
 देशमुखांचा पहिला कथासंग्रह 'अंतरीच्या गूढगर्भी' हा १९९५ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'उदक' (१९९७) - ‘पाणी! पाणी!!' या नावाने दुसरी आवृत्ती, 'नंबर वन' (२००८), 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' (२०१३) आणि 'अग्निपथ' असे एकूण त्यांचे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले. या पाचही कथांसंग्रहांमधून समाजजीवनातील काही एका वेगळ्या विषयसूत्रांची मांडणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मानवी भावजीवनातील नातेसंबंधांची सूक्ष्म वीण व तिच्यातील आडव्या-उभ्या धाग्यांची गुंतागुंत, अस्थानी सुलतानी संकटांमुळे कोलमडून पडणारे उद्ध्वस्त होणारे ग्रामजीवनातील भावविश्व, जैविक गरजांसाठी करावा लागणारा संघर्ष, प्रेमविषयक गहिरी जाणीव, क्रीडा विश्वातील प्रवृत्ती आणि अपप्रवृत्ती, स्त्रीभ्रूणहत्या व त्यानिमित्ताने ढवळून निघालेला महाराष्ट्र - अशासारखा काही सूत्रांना ही कथा अधोरेखित करते. या दोन दशकातील समाजजीवनातील स्पंदने टिपण्याचाच ही कथा प्रयत्न करत आली आहे.

४८ अन्वयार्थ