पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अकोल्यात असताना झाली होती, पण ती खोटी व बिनबुडाची असल्याचं नंतर सिद्धही झालं. पण त्या काळात मला विलक्षण त्रास झाला हे खरं.
 लेखनातही मी धाडसानं चाकोरीबाहेरचं लेखन केलं आहे. माझ्या 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मध्ये आज जगाला ज्याचा सर्वाधिक धोका आहे त्याचं समग्र चित्रण केलं आहे. मूठभर कट्टर मुस्लीम लोकांच्या कडव्या दहशतवादाचा धोका जो जाणवतो आहे, अनुभवास येत आहे, त्याची सुरवात अफगाणिस्थान मध्ये झाली व त्याचंही पाप शीतयुद्धातील स्पर्धेमुळे तत्कालिन सोवियत युनियन व प्रामुख्यानं अमेरिकेचं आहे. सांगलीला या कादंबरीवर बोलताना मी मुस्लीम दहशतवादावर बोलतो आणि त्याची भडक व विपर्यस्त बातमी एका वृत्तपत्रात बातमी आली व तत्काळ मुस्लीम समाज आणि तथाकथित पुरोगामी समाजाची संतप्त प्रतिक्रिया उमटली. मी जे सांगितलं ते सत्य होतं. पण मी मुस्लीमविरोधी आहे अशी राळ उठवली गेली. पण आक्षेप घेणाऱ्यांनी मी भेटत गेलो व माझी बाजू सांगत गेलो. त्यांना माझा मुस्लीम समाज व इस्लाम - हादिसचा किती सखोल अभ्यास आहे हे जाणवतं गेलं व मग विरोध मावळला गेला. तरीही पोलिसांकडे तक्रारी गेल्याच. मला वरून विचारणा झाली, पण तेवढंच. कोल्हापूरला असताना एका धर्मांतरित दलित ख्रिश्चन लेखकाच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सनातनी व रूढीबद्ध हिंदू समाजाच्या जाचामुळे अनेक दलितांनी धर्मांतर केलं व ख्रिश्चनांनी दयेच्या भावनेतून जे गरिबांसाठी काम केलं, तेवढं त्या काळी हिंदू समाजानं केलं नाही, असं मी बोललो, तेव्हा त्याची हिंदू धर्माभिमान्यांकडून तीव्र विरोधी प्रतिक्रिया आली. पण तेही वादळ काही दिवसात शांत झालं. माझ्या एका लेखामुळे मी अकोल्याच्या नगरसेवकांची बदनामी केली म्हणून शासनाकडे तक्रार काही नगरसेवकांनी केली, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला केवळ एका ओळीची लेखी समज देऊन ती फाईल बंद केली.
 आज मी तुम्हाला हे सहजतेनं सांगत आहे, पण त्या काळात मला त्याचा किती त्रास झाला हे माझे मलाच माहीत. पण एक मनात पक्कं होतं की, मी लेखनाप्रती अत्यंत प्रामाणिक होतो व त्यापासून ढळणार नव्हतो. सलमान रश्दी वा तसलीमा नसरीनप्रमाणे मला काही जीवे मारण्याची धमकी मिळालेली नव्हती व मला विजनवास किंवा देशांतराचा धोका नव्हता. पण मी माझ्यापुरती छोटी चकमक खंबीरपणे जरूर लढली असं म्हणेन. यामुळे की काय, हे दोन्ही लेखक मला विलक्षण भावतात. त्यांच्या लेखनासाठी, पण त्याहीपेक्षा अधिक त्यांनी अभिव्यक्ती - स्वातंत्र्यासाठी मोजलेल्या किंतीसाठी!

 मला येथे या निमित्ताने एक व्यापक प्रश्न उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे वाढती असहिष्णू प्रवृत्ती आणि बेताल झुंडशाहीच्या धोक्याचा. त्यांचा मुकाबला

अन्वयार्थ □ ३५३