पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करायला राज्यकर्ते मतपेट्यांच्या राजकारणासाठी करतात किंवा तेही प्रतिगामी व जाती-धर्माच्या संकुचित विचारात अडकलेले असल्यामुळे आतून त्यांनाच साथ देतात. तसेच बुद्धिमंत समाजही झापडबंद आहे व तो निवडक - सिलेक्टीव्ह प्रतिक्रिया देतो. तथाकथित कडवे पुरोगामी विचारवंत जेवढे हिंदू जमातवादावर व मूलतत्त्वांवर तुटून पडतात, तेवढे किंवा फारच कमी प्रमाणात मुस्लीम जमातवादावर प्रहार करतात. त्यामुळे उजव्यांच्या 'स्युडो - सेक्युलर' टीकेला बळ मिळतं. दुसरा प्रवाह हा महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या पार्श्वभूमीचा आहे. त्यामुळे ब्राह्मणांवर होणाऱ्या टीकेप्रमाणे (ती अगदी रास्त व योग्य आहे.) बहुजन समाजाच्या प्रतिगामित्वाच्या ऊहापोह करीत टीका करीत नाहीत. म्हणून माझं असं मत आहे की, कोणत्याही जाती - धर्माचा विचार न करता जे जे अनिष्ट, प्रतिगामी व मूलतत्त्ववादी - जमातवादी आहे, त्याचा विरोध व निषेध करण्यात आपण सारेच कुठेतरी कमी पडतो! ज्याप्रमाणे १९३०-४० च्या दशकात हिंदी-उर्दू पुरोगामी लेखकांनी 'प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोशिएशन' स्थापून १९३६ साली प्रेमचंदच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा घेऊन पुरोगामित्वाचा व 'नाही रे' च्या बांधिलकीचा उद्घोष करीत हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मातील कट्टरतेचा निषेध केला होता. त्यामुळे भारतीय साहित्यात एक नवी चैतन्याची लाट पसरली व साहिर, कैफी आझमी, इस्मत चुगताई, कृष्ण चंद्र, राजेंद्र सिंग बेदी सारखे पुरोगामी व गरिबांशी प्रतिबद्धता असलेले लेखक-कवी पुढे आले; तसचं काही आज महाराष्ट्रात देशपातळीवर करण्याची घडण्याची आवश्यकता आहे, असं मी नि:संदिग्धपणे सांगेन.
परसावळे -
 दलित - मुस्लीम हे आपल्या लेखनाचे प्रमुख विषय राहिले आहेत. या दोन्हीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? देशमुख - माझी 'दौलत' ही 'सलोमी' मधली लघुकादंबरी, माझ्या कथासंग्रहातील 'बंद लिफ्ट', 'उदक', 'भूकबळी' सारख्या कथा या दलित-शोषित वर्गाच्या प्रश्नाबाबत आहेत. तर माझी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'ही बृहद् कादंबरी मुस्लीम समाजाविषयी आहे. माझा एक आगामी कथासंग्रह, ज्याचे नाव मी निश्चित केले आहे ते म्हणजे 'पांचवी शहाबानो' - हा मुस्लीम समाजाच्या व्यथा - वेदना व जगण्याच्या कहाण्या सांगणारा असेल. त्यात समाविष्ट होणाऱ्या सर्व कथा विविध दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या आहेत. आता पुस्तकरूपाने येतील. म्हणजेच मी बऱ्याच प्रमाणात दलित व मुस्लीम समाजावर लेखन केलं आहे हे निश्चित.

 मी मूळचा मराठवाड्याचा. निजामी राजवटीमुळे मुस्लीम परंपरा व धर्म -

३५४ □ अन्वयार्थ