पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करीत लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कटिबद्धता स्वीकारली आहे, ती उदार, मानवतावादी व बरीचशी समाजवादी स्वरूपाची विचारधारा आहे. तीच माझी वैचारिक नाळ आहे व विचारधारा आहे. माझ्या लेखनातून हे उमटलं आहे असं जर वाचक - समीक्षकांना जाणवलं तर मी माझ्या वैचारिक नाळेशी सातत्यानं जुडला गेलो आहे असं मी समजेन.
 मी एक अक्षरश: अफाट वाचक आहे. सर्व प्रकारचे साहित्य मी वाचतो. कारण कोणत्याही विचारधारेपेक्षा मानीव जीवनाची कक्षा मोठी असते, त्यामुळे केवळ मी माझ्या विचारधारेचंच वाचत नाही. तरीही मला आवडणारे लेखक सांगायचे झाले तर प्रेमचंद, टागोर, शरदचंद्र चटर्जी व सआदत हसन मंटोचं नाव घेईन. जागतिक वाङ्मयात मला शेक्सपिअरच्या शोकांतिका, टॉलस्टॉय, पर्ल बक हे लेखक भावतात. इंग्रजीत लेखन करणाऱ्या भारतीयांमध्ये मला आर. के. नारायण व अलीकडचे अमिताब घोष व विक्रम सेठ आवडतात. मराठीत मला अरुण साधू, रंगनाथ पठारे, सर्व दलित वाङ्मय आणि विशाल मानवतावादी असलेलं म्हणून पु. ल. देशपांड्यांचे 'गणगोत'व 'व्यक्ती आणि वल्ली' आवडतात. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड, भैरप्पा, दुष्यंत कुमार, चंद्रकांत देवताळे, कुर्तुल ऐन हैदर, मनू भंडारी, कमलेश्वर; दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ व भावे हे मराठीचे पहिल्या फळीचे नवकथाकार; माझ्या मराठवाड्याचे बी. रघुनाथ आणि अलीकडचे राजन गवस, मंगेश डबराल ही काही आता बोलताना आठवलेली नावे माझे प्रिय लेखक म्हणता येतील. याखेरीज वैचारिक वाङ्मयाचा विचार केला तर नरहर कुरुंदकर, सदानंद मोरे, शेषराव मोरे, रफिक झकेरिया, अरुंधती राय हे मला विलक्षण भावतात.
परसावळे -
 लेखनात व जगण्यात मूल्यांची जपणूक करताना निर्भयपणे अनेकदा आपण जोखीम पत्करलेली दिसते. त्याचा काही उपद्रव झाला का?
देशमुख -

 प्रशासकीय सेवेत भ्रष्टाचार व बिनकायदेशीर कामांना नकार दिल्यामुळे राजकीय नेते व मंत्र्यांशी अनेकदा माझे वाद झाले, दडपणं आली व माझ्या निम्म्या बदल्या या मी त्यांच्याशी जुळवून घेत नाही (म्हणजे काय त्याचा अर्थ काय हे सांगायची गरज नाही)- म्हणून झाल्या आहेत. पण माझ्या तत्त्वासाठी व स्वच्छ कामासाठी ती मोजलेली किंमत होती. पण ती तशी फार मोठी होती, असं मी मानत नाही. पण एकूणच निःस्पृह अधिकाऱ्यांना बदनामी व तक्रारीला अधिक प्रमाणात सामोरं जावं लागतं, असं माझं निरीक्षण व अनुभव आहे. एक खोटी निनावी तक्रार माझ्याविरुद्ध

३५२ □ अन्वयार्थ