पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्ययास येतो. तसेच आपली पात्रे सगळ्याच जाती - धर्मातून परंतु निम्न स्तरातून आलेली दिसतात. हे कसे घडले?
देशमुख -
 कोणत्याही लेखकाला जे अंत:करणातून व प्रतिभेने स्फुरते, त्याप्रमाणे तो लिहीत जातो. माझेही तसेच आहे. आजवर जगण्यातून तसेच वाचन - चिंतनातून निरीक्षणातून सहअनुभूतीनं जे भावलं ते मी लेखनातून प्रकट करीत गेलो. त्यामुळे तुमचा हा प्रश्न ऐकताना क्षणभर मी स्तिमित झालो. आणि जाणवलं की, आपलं निरीक्षण खरं आहे. माझ्या अनेक कथांची प्रमुख पात्रे ही निम्न स्तरातून आली आहेत. उदाहरणार्थ, आता बोलताना आठवलं की माझ्या 'रात्र' या पहिल्याच कथासंग्रहातला नायक हा रात्री पावसाळ्यात बेडूक पकडून स्थानिक सायन्स कॉलेजात प्रयोगासाठी व डिसेक्शनसाठी पुरवणारा दलित सुशिक्षित आहे. 'पाणी! पाणी!!' मधील सारी पीडित माणसं व त्यांची सुख-दु:खे ग्रामीण दुष्काळी महाराष्ट्राचे आहेत. माझी पहिली कादंबरी 'सलोमी' ही धर्म परंपरेच्या जाचात काचून गेलेल्या एका बंडखोर मुस्लीम स्त्रीची कहाणी आहे. 'बास्टर्ड कथेतलं मध्यवर्ती पात्र एका पारधी स्त्रीच्या व एका उच्चवर्णीयांच्या संयोगातून जन्मलेल्या व सदैव बंडखोरी आणि 'प्रोटेस्ट' करणाऱ्या तरुणाचं आहे. त्यामुळे आपले निरीक्षण बऱ्याच प्रमाणात माझ्या किमान निम्म्या लेखनाला लागू पडतं.
 हे असं का घडलं असावं? मला वाटतं, माझी स्वाभाविक 'नाही रे' वर्गाशी असलेली बांधिलकी. तसेच प्रथम उप-जिल्हाधिकारी, मग कलेक्टर आदी पदावरून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात काम करताना प्रामुख्यानं ग्रामीण महाराष्ट्राचा संबंध आला. तळागाळातल्या माणसांचे प्रश्न सोडविणे हे या खात्याचं काम. माझ्यावरील गांधीवादी व युक्रांदीय संस्कारानं माझी वैचारिक तसेच भावनिक बांधिलकी दलित, शोषित व ग्रामीण शेतकऱ्यांशी सहजतेनं जुळत गेली. काम करताना त्यांचं जे जीवनविश्व पाहायला, अनुभवयाला मिळालं ते टीपकागदाप्रमाणे लेखक म्हणून माझ्या मनात टिपलं गेलं असणार. त्यातूनच माझे कथाविषय मला गवसत गेले.

 पण परसावळेजी, मला आत्मकेंद्री व उपभोगाच्या दुनियेत रमलेल्या श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय जीवनाचं फारसं आकर्षण कधीच नव्हतं, नाहीय. मी जरी चांगल्या नोकरीमुळे उच्च मध्यमवर्गीयात - आर्थिक बाबीचा विचार करता - सामील झालो असलो तरी माझे संस्कार व जीवनमूल्यं ही आजही मध्यमवर्गीय आहेत. त्यात साधी राहाणी बसते. तसेच, मला श्रीमंतीची मनात कुठेतरी एका बाजूला भीती वाटते, तर दुसऱ्या बाजूला तिटकाराही. त्यामुळे त्यांचं विश्व माझ्या साहित्यात फारसं आलेलं

३५० □ अन्वयार्थ