पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखक म्हणून आहे. ते जाणून व समजून घेत मी आजच्या माणसासाठी लिहितो. मला इथं साहिरचं गाणं तत्त्वज्ञान म्हणून एकदम मान्य आहे. 'ये पल उजाला है. बाकी अंधेरा है. ये पल गवाना ना. ये पल ही तेरा है. जीनेवाले सोच ले यही वक्त है करले पुरी आरजू.' म्हणून तुम्ही म्हणला नसतात तरी मी स्वत:ला वर्तमानाचा, समकालीन लेखक म्हणून घेतलं असतं. समकालीनत्व हा माझ्या लेखनाचा 'यु. एस. पी.' आहे म्हणा ना!
 पण याचा अर्थ असा नाही की, समकालीन लेखन हे क्षणजीवी असतं, मौलिक नसतं. मानवी भाव-भावना, माणसाचे षड्रिपू हे सार्वत्रिक व कालातीत एका अर्थाने सनातन आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर टॉलस्टॉयच्या 'अॅना कॅरेनिना' मधली विवाहबाह्य संबंधाची कथा एका अर्थानं त्या काळाची जितकी होती, तितकीच ती आजची, तसेच वैश्विक व कालातीत आहे. कारण समाजव्यवस्थेसाठी विवाहसंस्था माणसानं निर्माण केली व विवाहबाह्य संबंध निषिद्ध मानले. पण स्त्री-पुरुष आकर्षण व प्रेम हे जेव्हा उत्कट व असीम असतं तर मग कधी-कधी विवाह संबंध व नैतिकतेची चौकट ओलांडली जाते. हे काल, आज व उद्याचं पण वास्तव आहे. महाभारताचं युद्ध हे सत्ता, जमीन व संपत्तीचं होतं, त्यात सत्-असत्ची सरमिसळ पाहायला मिळते. त्यामुळे ते आजही जिवंत आहे. सबब आजचं सर्वच समकालीन लेखन हे क्षणजीवी असेल असं समजायचं कारण नाही. ते उद्या पण समकालीन वाटू शकेल, जर परिस्थिती व मानवी भावना - संस्कृतीत बदल झाला नाही तर. मी गंमतीनं विंदा करंदीकरांची एक कविता थोडी बदलून असं म्हणेन की, 'लिहिणाऱ्याने लिहीत जावे. वाचणाऱ्यांनी वाचत जावे. वाचता वाचता वाचकांनी एक दिवस लेखकाचे मन व्हावे!' आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की, माणस हा मर्त्य आहे आणि चिरंजीवत्व हे शाप आहे माणसासाठी. त्यामुळे मला जीवनाचे हे क्षणभंगुरत्व व मर्त्यपणा मान्य आहे व माझ्या लेखनालाही तो न्याय लागत असेल तर मला वाईट वाटायचं कारण नाही.
 माझ्या लेखनातलं समकालीनत्व हे नैसर्गिक आहे, तसंच मी ज्या वातावरणात जगत - वाढत गेलो, जे वाचन - चिंतन केलं आणि प्रशासकीय सेवेत मनापासून लोकांसाठी संवेदनक्षमतेनं काम करताना माणसं, प्रश्न व समस्या कळल्या, त्यातूनच माझं समकालीन वर्तमानाचं दर्शन घडविणारं लेखन घडत गेलं असावं, असं माझं मत आहे.
परसावळे -

 मानवी दुःखाला भिडणारा हा आपला स्थायीभाव असल्याचे आपल्या लेखनातून

अन्वयार्थ □ ३४९