पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. याच्या जोडीला ग्रामीण भागातील मध्ययुगीन संस्कार, अहंकार व पीळ अजूनही नसानसात बाळगून असलेल्या जमीनदार व राजकारण्यांबद्दलही मला श्रीमंताप्रमाणे एक प्रकारचा सूक्ष्म तिटकारा आहे. अर्थात लेखक म्हणून त्यांनाही जाणणं माझी अपरिहार्यता आहे. पण त्यांच्यासाठी खचितच माझी सहानुभूती असत नाही. माझी ही मानसिकताच कदाचित माझ्या लेखनाचे विषय ठरवीत असावी. नव्हे असते.
 मुख्य म्हणजे कोणत्याही प्रमुख लेखकाचं लेखन पहा, ते दुःख, वेदना व जगण्याच्या संघर्षाची कहाणी सांगत असतं. टॉलस्टॉयच्या एका कादंबरीचं पहिलंचं वाक्य आहे, 'जगात सुखी माणसाच्या कथा सर्वत्र समान असतात, मात्र प्रत्येकाच्या दुःखाची कहाणी मात्र भिन्न असते.' मला हे मान्य आहे. म्हणून दुःख-वेदनेला भिडणं व लेखन करणं ही माझी स्वाभाविक प्रेरणा आहे. त्यामुळे माझी ही पात्रे कदाचित वंचित घटकातून आणि निम्न स्तरातून आली असणार. माझं हे विवेचन तुम्हाला पटायला हरकत नाही.
परसावळे -
 आपण विशिष्ट स्वरूपाची बांधिलकी मानत नसला तरी आपणास जवळची वाटणारी विचारधारा व लेखक कोणते?
देशमुख -

 कोणत्याही सच्चा कलावंताप्रमाणे मी स्वत:ला कोणत्याही विचारधारा व इझमशी कधी बांधून घेतलेले नाही. कारण जगात अंतिम व कालत्रयी न बदलणारं असं सत्य नसतं, हे माझं ठाम मत आहे आणि दुसऱ्या विरोधी बाजूतही सत्याचा अंश असतो, असं मी मानतो. कोणतीही एक विचारधारा मानवी कल्याणाचं अंतिम उत्तर असत नाही. त्यामुळे विचारधारेपेक्षा माणसं व त्यांचं सुख - दुःख मला अधिक महत्त्वाचं वाटतं. तरीही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर गांधीवाद मला सर्वात जवळची आपली विचारधारा वाटते. कारण तिनं अंत्योदयाचं स्वप्न पाहिलं आहे. तसेच, खरा भारत हा खेड्यात वसलेला आहे - हे गांधीचे मत मला ग्राह्य वाटतं. त्यांनी घटना करणाऱ्या संविधान सभेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जो तावीज - मंत्र दिला होता ती माझी विचारधारा आहे, असं मी म्हणू शकतो. बापूचा तो मंत्र असा होता, 'जेव्हा तुम्ही (राज्यकर्ते, शासक इ) शंकित व्हाल, तेव्हा सर्वात दीन पददलित माणसाचा चेहरा नजरेसमोर आणा आणि स्वत:ला विचारा की, माझ्या कामानं या माणसाच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि तुमची संभ्रमावस्था नाहीशी होत मार्ग दिसू लागेल.' भारतानं आज घटनात्मक संसदीय लोकशाही स्वीकारत समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचा उद्घोष

अन्वयार्थ □ ३५१