पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघर्ष पण मला अस्वस्थ करतात. काश्मीर समस्या मला भारत-पाक संबंधाची एक भळभळती जखम म्हणून विद्ध करते. त्यावर मी लवकरच 'इन्किलाब' सारखी बृहद्कादंबरी लिहायला घेणार आहे. पुन्हा मला हैद्राबादचा मुक्ती संग्रामही सतत खुणावत असतो. थोडक्यात जागतिक समस्या मला लेखक म्हणून खुणावत असतातपण प्रामुख्याने मुस्लीम जगत व इस्लाममधला संघर्ष- कट्टरता व मॉडरेटमधला संघर्ष-अधिक वेधक वाटतो.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी मराठवाड्यात असतानाच लिहून झाली. आज दहा वर्षानी २०१५ मध्ये तिची संपादित जनावृत्ती प्रकाशित होणार आहे. तिला मी नव्याने उपोद्घात (प्रोलॉग) व उपसंहार (इपिलॉग) लिहिण्याचं ठरवलं आहे. त्याचं कारण, मला ती कमी, उणं वाटते हे नाही तर मी ज्या टप्प्यावर ही कादंबरी संपवली त्यानंतर आज एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा एकदा अफगाणिस्थान हा तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची चिन्हं दिसत आहेत. म्हणून थोडी भर टाकायची आहे.
 इतराप्रमाणे मलाही माझ्या प्रकाशित लेखनात नंतर काही उणिवा दिसू लागतात. कारण त्यानंतर आपली समज, आकलन वाढलेलं असतं. अधिक अनुभवाचं गाठोडं जमा झालेलं असतं; पण हे असं होणं क्रमप्राप्त असतं. तरीही मी जे लिहिलं त्यावर . खूश असतो. स्वत:चं मूल कितीही वेडब्रिदं असलं तरी आईला ते प्रिय असतं, तसंच लेखन म्हणून माझी निर्मिती मला आवडते; कारण ती माझी असते, तिचा मी रचयिता असतो.
विनोद व रूपाली :
 मुलाखत छान झाली. तुम्ही सर्वच प्रश्नांना मनापासून उत्तरे दिली. तुमचं हे साहित्याचं चिंतन मराठी वाचक, समीक्षक आणि अभ्यासकांना विचारप्रवृत्त करेल, यात आम्हां दोघांना शंका वाटत नाही. आपण एवढा वेळ दिला, त्याबद्दल आभार.
लक्ष्मीकांत देशमुख :

 धन्यवाद !

अन्वयार्थ □ ३४५