पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेथेच मी घालवला. त्या काळात त्या भागात पाणीटंचाई मी जवळून पाहिली, अनुभवली. एक सहज आठवण झाली म्हणून सांगतो... मुरुम, तालुका उमरगा हे माझे मूळ गाव. शालेय वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत तेथे मी जात असे. तेथे पाणी टंचाई खूप होती. एका सार्वजनिक विहिरीवरून पिण्याचं पाणी शेंदून आणावं लागायचं. मला पोहरा-घागर दोरीला लावून उघड्या विहीरीत सोडून पाणी शेंदता येत होतं. उस्मानाबदला फरशी गल्लीत आमचं वास्तव असताना दुरून पाणी आणावं लागायचं. तसंच प्रशासनात सातत्यानं दुष्काळाशी सामना करावा लागला. आणि परभणीला १९९५९६ ला असताना कधीतरी पहिली कथा ‘बांधा' लिहिली, मग 'पाणी चोर'; आणि लक्षात आलं की कितीतरी पाणी टंचाईचे संदर्भ मनात भिनलेले आहेत. ते मग अलगद बाहेर आले, त्या कथा झाल्या. आणि माझा पहिला एका प्रश्नाभोवती केंद्रित झालेला थीमबेस्ड कथासंग्रह किंवा कथामालिका झाली. आज पंधरा वर्षानी तो कथासंग्रह वाचतो किंवा २०१० साली त्यातील सहा कथांची नामवंत कलावंताच्या आवाजातली कथा- वाचनाची ऑडीओ सीडी आली तेव्हा त्याचा विचार केला तर वाटलं की आपण फार संयमानं लिहिलंय. पाणी टंचाई व दुष्काळाचं वास्तव कितीतरी जास्त दाहक आहे व ग्रामीण माणसावर त्याचा होणारा परिणाम कितीतरी खोल आहे.... तो मला पूर्ण समग्रतेनं पकडता आला नाहीय. आजही महाराष्ट्र तहानलेला आहे, नव्हे, त्याची ती तहान वाढलेली आहे... हे मागेपुढे कदाचित लिहीनही. आज सांगता येत नाही.

 'इन्किलाब'चं बीजही मला १९९४-९५ मध्ये परभणीत असतानाच सुचलं. कारण त्यावेळी अफगाणिस्थानमध्ये कम्युनिस्ट राजवट चालू होती. मुजाहिदीननी सत्ता काबीज करून जेव्हा १९९६ मध्ये नजिबुल्लाहला भर चौकात सरे आम फाशी दिली आणि शरीयाप्रणीत राजवट आणली- स्त्रियांचं शिक्षण बदं करीत त्यांना बुरख्यात बंदिस्त केलं, तेव्हाच हे कादंबरीचं कथानक व ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' हा संघर्ष सुचला. त्याला माझी मराठवाडी पार्श्वभूमी कारणीभूत होती- असणार. कारण माझ्या भागात- खास करून शहरात- जिल्हा मुख्यालयी मुस्लीमांची लक्षणीय लोकसंख्या आहे. आणि माझे अनेक मुस्लीम मित्र आहेत. उर्दू शायरी व मुशायराचं मला वेड होतंते आजही कायम आहे. परभणी-खुलताबादच्या उरुसात कव्वाली ऐकणं हाही माझा शौक होता. पुन्हा नरहर कुरुंदकरांमुळे मुस्लीम प्रश्न, इस्लाम, भारतीय फाळणीवरचं वाचन झालं. रफिक झकेरिया, असगर अली इंजिनिअर आदींचे ग्रंथ जिज्ञासेपायी वाचत गेलो. ही माझी पार्श्वभूमी मला 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' चं कथानक सुचण्यास कारणीभूत ठरली असणार. पुन्हा मला जगातील अनेक प्रश्न ललित अंगानं अस्वस्थ करतात. जपानमधील अणुस्फोटामुळे १९७०-७५ पर्यंत अणुविकृत माणसं जन्मास येणं - त्यावरची माझी 'हिबाकुशा' ही कथा आहे ही श्रीलंकेमधील तामिळ- सिंहली

३४४ □ अन्वयार्थ