पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरज आहे?) इंप्रेस करण्यासाठी पण आतून उत्कटतेनं वाटतं म्हणून लेखन सुरू झालं. मध्ये (पूर्ण न झालेलं) संशोधन- (त्यावरही मी लिहिलं होतं. जे नितांत वैयक्तिक म्हणून छापले नाही) आणि नोकरी- प्रथम बँक, मग स्पर्धा परीक्षा व उपजिल्हाधिकारीच्या कामात झोकून दिल्यामुळे मोठा गॅप पडला. पण वयाच्या पंचविशीत पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दुसरा त्यानंतर साताठ वर्षांनी आला. तरी मधल्या काळात लेखन सरूच होतं. स्वत:च्या मनात ही भावना मात्र होती की, आपण जरा वेगळं- लिकसे हटकर लिहीत आहोत.
 माझ्या लेखनाची यत्ता कोणती हे मला माहीत नाही, त्याचा न्याय निवडा मी नेहमीच वाचक व समीक्षकांवर सोडला आहे; पण एक ठामपणे विधान करू शकतो, माझ्या लेखनावर कुणाचीही छाप नाही. कुणाचेही मी अनुकरण केलेलं नाहीय, किंवा कुणाच्या शैलीचा अभ्यास करून तसं प्रभावाखाली येत लिहिण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. मराठीत मला अरुण साधू, रंगनाथ पठारे, जी. ए. कुलकर्णी आवडतात. पण त्यांचा माझ्या लेखनावर परिणाम झालेला नाही. मी हिंदी-इंग्रजीचंही बरंच वाचन केलं आहे. पण मी माझ्या स्वत:च्या जाणिवेतून घडत गेलेला लेखक आहे.
 लेखक म्हणून माझी काही खास अशी महत्त्वाकांक्षा होती, आहे असं मला वाटत नाही. पण सतत लिहावं आणि वाचकांना जे आवडावं, समीक्षकांना ते प्रभावित करावं ही इच्छा मात्र सदैव राहिली आहे. मला साहित्यविषयक बरीच पारितोषिकंही मिळाली आहेत, तरीही 'इन्किलाब' वा 'नंबर वन', 'बखर भारतीय प्रशासनाची' याला मला जी काही महत्त्वाची पारितोषिके मिळायला हवी होती, ज्यासाठी ह्या माझ्या साहित्यकृती पात्र होत्या असं मला वाटत होतं, त्या मिळाल्या नाहीत हे खरं. दोन पारितोषिकं मला मिळता मिळता राहून गेली. असं त्या पारितोषिक समितीमधल्या सदस्यांनीच नंतर सांगितले, तेव्हा खंत वाटण्याखेरीज काय हाती होतं? असो, भरपूर लिहिणं व लिहिलेलं छापलं जाणं ही प्राथमिक महत्त्वाकांक्षा आजही कायम आहे. पारितोषिक, सन्मान कुणाला नको असतात? मलाही ती गुणवत्तेच्या जोरावर मिळावेत ( मिळाले पण आहेत) असं वाटतं हे मात्र खरं!
विनोद शिरसाठ :
 'नंबर वन' हे पुस्तक क्रीडा संचालक म्हणून काम करताना २००८ साली प्रकाशित झालं आहे, पण त्या लेखनाची बीजं आधीच कधीतरी पडली होती. व संधी मिळताच उगवून आली असे काही झाले आहे काय?
लक्ष्मीकांत देशमुख :

 तुमच्या प्रश्नातच उत्तर सामावलं आहे. सुरवातीच्या लेखनात मी क्रीडापटूवर

३४२ □ अन्वयार्थ