पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिलं. 'ब्रदर फिक्सेशन' व 'अखेरचे षटक' या कथांना मानाच्या कथास्पर्धात पारितोषिके मिळाली होती. खरं तर मी त्या अर्थानं खेळाडू नाही, पण खेळात प्रचंड रस आहे. त्याहीपेक्षा कलाजगताप्रमाणे क्रीडाजगतातील खेळाडू, त्यांचं वर्तन, त्यांची मानसिकता व त्यांचे जय-पराजय- मला कायम एक माणूस म्हणून व एक लेखक म्हणून आव्हान देत आले आहेत. त्यातूनच या क्रीडा-कथा लिहून झाल्या. मग २००७-२००८ मध्ये मी राज्याचा क्रीडा संचालक झालो व त्याच काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरची राष्ट्रकुल युवाक्रीडा स्पर्धांचं आयोजन झालं, त्यात माझा सहभाग होता. त्या निमित्तानं खेळाडू, खेळांची असोसिएशन्स आणि खेळांचं जवळून दर्शनआकलन झालं आणि एकामागून एक क्रीडा कथा सुचत गेल्या. आणि त्या लिहून प्रकाशित झाल्या. 'नंबर वन' नंतरही मी तीन / चार क्रीडा विषयक कथा लिहिल्या. अगदी २०१४ च्या 'अष्टपैलू' या क्रीडाविषयक दिवाळी अंकातही फ्री फॉल जंप आणि अॅडव्हेंचर स्पोटर्सवर शीतल महाजन आणि कृत्रिम पायानं एव्हरेस्ट जिंकणारी अरुजिमा सिन्हाच्या कामगिरीचे अनोखं मिश्रण करून एक पूर्ण काल्पनिक पण वास्तवावर आधारित साहसी क्रीडाकथा लिहिली आहे. नूरा (म्हणजे खोटी लढत देऊन मुद्दाम हार पत्करणे) कुस्तीवर पण एक कथा लिहिली आहे, जिच्यावर आगामी काळात चित्रपट येण्याची शक्यता आहे. त्याची पटकथा व संवादही लिहून तयार आहेत. तसंच 'नंबर वन' मधील 'फिरून नवी जन्मेन मी' वर 'जगज्जेती' नामक सिनेमाची पटकथा, संवाद मी लिहिले आहेत. जर सिनेमाचं जमलं नाही तर त्याचं रूपांतर नंतर कधी तरी कादंबरीत करेन.
विनोद शिरसाठ :
 तुमची जडणघडण मराठवाड्यात झाली असल्याकारणाने पाणी टंचाई केंद्रभागी असलेला 'पाणी! पाणी!!' कथासंग्रह आला असावा. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहायला तुमचे आई-वडील ज्या हैद्राबाद संस्थानात (निजाम राजवटीत) जन्मले, वाढले व तुमचंही बालपण त्याचा भाग असणाऱ्या मराठवाड्यात गेलं म्हणून ती पार्श्वभूमी कारणीभूत असणार, त्यातून बाहेर आल्यावर बराच काळ लोटल्यावर आणि वेगळ्या प्रदेशात राहिल्यानंतर पूर्वीच्या त्या लेखनात काही अधिक-उणे दिसतं का?
लक्ष्मीकांत देशमुख :

 तुमचा हा प्रश्न मी जरा वेगळ्या पद्धतीने विचारात घेऊन उत्तर देतो. हे खरं की, मी मूळचा मराठवाड्याचा. आज पुण्यात असूनही मराठवाड्याच्या मातीचा टिळा मी अभिमानाने मिरवतो. त्या भागात माझं बालपण, कॉलेज जीवन आणि नोकरीची पहिली पंधरा-वीस वर्षे, म्हणजे साधारणपणे चाळीशी-पंचेचाळीशी पर्यंतच्या आयुष्याचा काळ

अन्वयार्थ □ ३४३