पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी कथा सुचली आहे. ती लवकरच लिहिणार आहे. मूळ दलित माणूस मुस्लीम होतो आणि 'घर वापसी'नं पुन्हा हिंदू होतो, पण त्याची जात कायम राहाते. त्याच्या धर्मांतर न केलेल्या भावावर त्यानं उच्चवर्णीय मुलीशी प्रेमविवाह केला म्हणून बहिष्कार चालू आहे. याला मुस्लीम असताना गाव बहिष्काराचा फटका बसत नाही, पण 'घर वापसी' करून पुन्हा तो हिंदू धर्मात, नव्हे, हिंदूमधील दलित जातीत परततो आणि त्याच्यावरही गांव-बहिष्कार टाकला जातो... अशा आशयाची कथा मला सुचली. हे मी यासाठी थोडं सविस्तर सांगितलं की मला नेहेमीच माझ्या सामाजिक भानामुळे अशा सामाजिक आशयाच्या कथा सुचतात. मी पुन्हा कोणत्याही इझमचा नाही, त्यामुळे डाव्या, उजव्या, मुस्लीम-बौद्ध धर्मीयांच्या संदर्भात त्यांचं माणूसपण व संघर्ष विसंगतीच्या व टकरावाच्या कथा सुचतात. त्यामुळे माझा असेल कोणता 'इझम' तर तो 'ह्युमॅनिझम' आहे असं मी मानत आलो आहे.
 समग्र सामाजिक भान व आकलन हे कोण्या एका मानवी मनाच्या आवाक्याबाहेरचे आहे. मी त्याला अपवाद नाही. पण तरीही ते सातत्याने वाढत आहे, त्याचे नवे नवे पैलू जाणवत आहेत. त्या अर्थानं माझी वाढ चालू आहे, खुंटलेली नाहीय. म्हणून त्या संदर्भात अजूनही लेखनाचं वैविध्य, सखोलता व उंची (जी गाठली आहे आजवर त्यापेक्षा अधिक) गाठायची आहे, असंच फार तर मला प्रांजळपणे कबूल करता येईल.
विनोद शिरसाठ :
 तुम्हांला मी थोडं मागे जाऊन पाहायला लावत एक प्रश्न विचारतो. आपण चांगले लेखन करू शकतो याची जाणीव साधारणपणे सुरुवातीच्या काळात कधी वाटले होते का? लेखक म्हणून काही महत्त्वाकांक्षा मनात ठेवली होती का?
लक्ष्मीकांत देशमुख :

 प्रत्येक जरी नाही तरी काही चांगल्या वाचकांना वाचनाच्या एका टप्यावर आपण लेखन करू शकतो याचा आत्मसाक्षात्कार होतो, असं जे म्हटलं जातं ते माझ्याबाबत नि:संशय खरं आहे. बालपणापासून वाचनाची गोडी लागली व समोर येईल ते वाचू लागलो. सहावी-सातवी दरम्यान कधी तरी चार-दोन बालकथा लिहिल्या गेल्या. तसंच काही कथा-लेख (शालेय हस्तलिखित मासिकात). नंतर कॉलेज सुरू झालं आणि गांभीर्यानं सतत नसलं, तरी अधून मधून कथालेखन सुरू झालं. साधारणपणे वयाच्या विशीमध्ये माझ्या कथांना तीन-चार कथालेखन स्पर्धेत प्रथम वा द्वितीय क्रमांकाचं बक्षिस मिळालं आणि जाणीव झाली, की आपण चांगलं- मुख्य म्हणजे वेगळा आशय असलेलं- लेखन करू शकतो. आणि त्यावेळच्या तरल तरुण भावविश्वात स्वत:चं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी (इतरांना कुणाला? सांगायची

अन्वयार्थ □ ३४१