पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भात) बाबा कदम, सुहास शिरवळकर आदींच्या रंजक साहित्यापासून जी. ए., नेमाडे, शाम मनोहर आदींच्या गंभीर, आशयप्रधान व शैलीदार साहित्यापर्यंत व्हाया रंजक पण गंभीर लिहिणारे जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी इ. द्वारे रुंदावत व सखोल होत गेला पाहिजे. माझा तसा होत गेला. शालेय वयात वर्ध्याच्या राष्ट्रभाषा समितीच्या बी. ए. समकक्ष पर्यंतच्या हिंदीच्या परीक्षा दिल्या. त्यामुळे हिंदी साहित्याचे वाचन सुरू झालं. पुढे इंग्रजीचं. त्यामुळे माझं साहित्यभान विस्तृत झालं व आकलनही. पुन्हा मला वृत्तपत्र-मासिक वाचायची पण भारी आवड- नव्हे, व्यसनच आहे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं अर्थशास्त्र, समाजशास्त्र इतिहास आदी मानव्य शाखांचा अभ्यास झाला. नांदेडला चालत्याबोलत्या नरहर कुरुदंकर नामक विद्यापीठाचाही स्वयंघोषित विद्यार्थी म्हणूनही अनेक विषयाचं सहजतेनं झानार्जन झालं. या साऱ्याचा परिपाक म्हणून आधी समाजाचं- समाज स्थितीचं व पर्यायानं साहित्याचं माझं आकलन वाढत गेलं !
 माझ्या काही सुरुवातीच्या कथांचे विषय हुंडा नाकारून अविवाहित राहाणं पत्करणारी स्त्री, क्रीडा स्पर्धा व खेळाडूंचे विश्व, सैल झालेले नातेसंबंध असे होते. पण तरीही माझ्या पहिल्या दोन संग्रहातील कथांचे विश्व माझ्या तरुण मनाचे प्रतिबिंब आणि भावभावना व्यक्त करणारे होते, त्या दृष्टीने 'स्वत:च्या मनाचा एक्सरे रिपोर्ट', 'माझे अबोलणेही', 'अभिमान' आदी कथांकडे मी आज पहातो. पण तरुणपणी कविता व गद्यात प्रेमकथा लिहिली पाहिजे, या अलिखित नियमाला मी अपवाद होतो हे मात्र नक्की. प्रेम, स्त्री-पुरुष संबंध, त्यातील गुंतागुंत याबाबतच्या काही कथा जरूर लिहिल्या. माझा आगामी कथासंग्रह 'मृगतृष्णा' अशाच काही कथांचा संग्रह आहे. खरं तर माझा मनस्वी स्वभाव, प्रेम संकल्पनेचं आकर्षण आणि स्त्रीबाबतची स्वाभाविक ओढ पाहाता मी प्रेमकथा का लिहिली नाही याचं मलाही कारण सापडत नाही. किंवा असं असेल का, त्यात मला वेगळं सांगण्यासारखं काही सुचलं नसेल... पण प्रथमपासून माझं प्रखर सामाजिक भान मला सामाजिक आशयाच्या, भोवतालच्या परखड वास्तवाच्या आणि माणसाच्या संघर्षपूर्ण जगण्याच्या कथा लिहायला प्रवृत्त करून गेलं. त्यामुळे माझ्या साहित्यविषयक आकलनाचे व लेखनाचे भिन्न भिन्न टप्पे आहेत, असावेत अशी माझी धारणा आहे.

 आणि मला हे पटतं की, लेखक कथाविषय निवडत नाही, तर त्याची प्रवृत्ती निवड करते. मी समाजात काय घडतं याचा अत्यंत जागरूक वाचक, निरीक्षक व अभ्यासक आहे. त्यातूनच मला चटकन नवं काही सुचतं. अगदी आजच (दिनांक २३ डिसेंबर २०१४ चं) उदाहरण देतो. गेले पंधरा दिवस संघ परिवाराचं शुद्धीकरणाचं, जे हिंदू पूर्वी धर्मांतर करून मुस्लीम-ख्रिश्चन झाले, त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचं 'घर वापसी' काम संसदेत गाजत आहे. यावर मला 'घर वापसी- पण गांवकुसाबाहेरची'

३४० □ अन्वयार्थ