पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेतृत्वाचं जग आहे. आता या पुढे गांधी, मंडेला, मार्टीन ल्युथर किंग निर्माण होतील की नाही ही शंका आहे. त्यामुळे व्यापक हित पाहाणारी समाजवादी व्यवस्था व परस्परांना साह्य करीत सर्वांचाच उद्धार व्हावा अशी प्रेरणा असलेली सहकारी चळवळ आता किती सडली आहे हे सांगायला नको. त्यामुळे जगात भांडवलशाही सर्वत्र फोफावली आहे. तिनं संपत्ती व समृद्धी निर्माण केली आहे, हे पण विसरून चालणार नाही. आज नारायण मूर्ती म्हणतात त्याप्रमाणे 'कंपॅनशेट कॅपिटलिझम'- उदारकरुणाधिष्ठित भांडवलशाही हवी आहे. या पार्श्वभूमीवर खाजगीकरण सार्वत्रिक झाले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
 मी २००४-२००५ या वर्षभरात आय.आय.एम. बेंगलोरला पब्लिक पॉलिसीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम- एम. बी. ए. केला होता. स्वांतसुखाय व ज्ञानाची प्रबळ प्रेरणा म्हणून. तेव्हा 'खाउजा'चा अभ्यास केला होता. पुन्हा प्रशासनात काम करताना सहकार क्षेत्र, व्यापारी आणि राज्यकर्त्याचे वर्तन, प्रेरणा व कामे-धोरणे पाहिल्यावर खाजगीकरण हे 'लेसर इव्हिल' म्हणून स्वीकारणं क्रमप्राप्त आहे. आणि जागतिकीकरण व उदारीकरण हे सर्व देशांनी एकत्र येऊन प्रश्न 'गॅट' व नंतर 'डब्ल्यु. टी. ओ.'च्या माध्यमातून स्वीकारल्यामुळे ते आजचे वास्तव आहे. त्याचे जसे फायदेशीर व सकारात्मक पैलू आहेत, तसंच त्यांचे काही नुकसानदायी नकारात्मक भागही आहे. देशाचे नेतृत्व जास्तीतजास्त फायदा कसा करून घेत नुकसान कसे टाळता येईल यासाठी दक्ष राहात कणखरपणे धोरणे आखेल तर आपली प्रगती वेगाने होऊ शकते. भारत यात कमी पडला म्हणून आजचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
 माझं हे तत्त्वचिंतन म्हणा, वा अभ्यास आहे; त्यामुळे मी लेखनात वा चर्चेत याबाबत पॅक्टिकल भूमिका घेतो. अकारण अज्ञानमूलक नकारार्थी सूर लादत नाही, एवढाच त्याचा मथितार्थ.
विनोद शिरसाठ :
 जागतिकीकरण व एकूणच 'खाउजा' आणि साहित्याकडे आपण कसे बघता? ह्याचे सूर तुमच्या लिखाणात उमटलेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? मराठी साहित्यामध्ये जागतिकीकरणाचे किती प्रतिबिंब उमटले आहे असे तुम्हास वाटते?
लक्ष्मीकांत देशमुख :

 हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे विनोदजी. जागतिकीकरण आणि साहित्य यावर जगात सर्वत्र विचार चालू आहे. मी मात्र जागतिकीकरणाचा संस्कृतीच्या संदर्भात विचार करून मत मांडणं पसंत करेन. त्यात साहित्य हे येणारच.

३३६ □ अन्वयार्थ