पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वच्छपणे मान्य केले तर मग त्याला कसं समोर जायचं हे समजू शकेल.
 जागतिकीकरण ही काही या तीन-चार दशकातील बाब नाही. ती पूर्वापार चालत आलेली बाब आहे. जुन्या काळात भारताचा दक्षिण मध्य आशियाशी व्यापार होता, बुद्धधर्म अनेक देशांत पसरला होता. भारताचे जागतिक व्यापार-संबंध होते. भारतात वास्को द गामा आला होता, मग फ्रेंच, पोर्तुगीज व शेवटी इंग्रज आले. जहाज व विमानाने जग जवळ आले. हे सारे आधीच घडले आहे. मग माध्यमक्रांती झाली, आय. टी. व इंटरनेटचे युग आले व संपर्काच्या साऱ्या सीमारेषा अडथळाविरहित होत पुसल्या गेल्या. प्रत्यक्ष परदेशी जायला आज पासपोर्ट- व्हिसा लागतो, पण इंटरनेट व माध्यम साधनांमुळे घरबसल्या कुणाशीही संपर्क, चॅटींग करता येते. जगभरचे कार्यक्रम, सिनेमा, मालिका, खेळ, बातम्या पाहाता येतात. त्यामुळे जागतिकीकरण हा चर्चेचा विषय राहिला नाही, तर आज ती वस्तुस्थिती आहे.

 वास्तविक जागतिकीकरण (व उदारीकरण पण) हे अर्थकारणासाठी जगाने एकत्र येऊन नवीन धोरणात्मक व्यवस्था स्वीकारत्याचे दृश्यरूप आहे. भांडवल, पैसा, व्यापार व मनुष्यबळाचा मुक्त संचार हे या जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे. डाव्यांचा कितीही कडवा झापडबंद विरोध असला तरी आज जगानं जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे व त्यानं देशांचा आर्थिक विकास झाला आहे व गरिबी पण बरीच कमी झाली आहे. भारतातही या दोन-अडीच दशकात जी प्रगती झाली आहे, आर्थिक विकास झाला आहे व ज्या प्रमाणात गरिबी कमी झाली आहे, त्यामुळे जागतिकीकरणामुळे फायदा झाला आहे हे मान्य केले पाहिजे. पण संपत्तीचे विषम वाटप, दादागिरी करणाऱ्या विकसित राष्ट्रांचे दडपण यामुळे अनेक चुकीचे निर्णय भारतात घेतले, त्यामुळे शेतीचा कुंठित झालेला विकास व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्पादन क्षेत्राची मंदी असे प्रश्न गंभीर झाले आहेत. तो दोष राजकर्त्यांच्या लघुदृष्टीचा व धोरणांचा आहे. एका व्यापक अर्थानं जागतिकीकरणाची ही काळी बाजू आहे. आणि लोककल्याणकारी राज्य प्रशासनाला आव्हान आहे शिक्षण, आरोग्य व मानवी विकासात गुंतवणूक कमी करणं हे जर जागतिकीकरणाच्या नावाखाली व तत्त्वाचा भाग म्हणून होत असेल तर ते चुकीचं आहे.असं म्हणणं भाग आहे. खाजगीकरण ही संकल्पना मानवी स्वार्थमूलक वृत्ती ओळखून निर्माण झालेली व्यवस्था आहे. समाजवाद व सहकार हे आदर्श आहेत, पण मानवी स्वभाव मूलत: स्वार्थी आहे, त्याला नफा व मालमत्तेची ओढ आहे. ती त्याची प्रमुख कार्यप्रेरणा आहे. काही ध्येयदारी व विचारी माणसं त्याला अपवाद असतात. जेव्हा म. गांधींसारखा युगपुरुष अवतरतो, तेव्हा काही काळ सर्व समाज, देश त्यानं भारावून स्वार्थत्यागाला तयार होतो. पण आता विसाव्या शतकाचा उत्तरार्ध व एकविसावे शतक हे जगभरच खुल्या

अन्वयार्थ □ ३३५