पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सांस्कृतिक अंगानं जागतिकीकरणाचा विचार केला तर असं लक्षात येईल की दळणवळण व संपर्कक्रांतीमुळे आज इतिहासात कधी नव्हे ते सर्व जग जवळ आलं आहे. जागतिकीकरणामुळे अर्थकारण, श्रमशक्ती, भांडवल आणि तंत्रज्ञानाची आयात-निर्यात व मोबिलिटी वाढली आहे. भारतातून बाहेर जाणारी माणसं काही दशकापूर्वी ब्रेनड्रेन संबोधिली जायची, पण आज तो व्यापक अर्थानं 'ब्रेनगेन' आहे, त्यामुळे भारताचा विकास होत आहे. भारतातले तरुण-तरुणी जगभर श्रमप्रधान व बौद्धिक क्षेत्रात मोठ्या संख्येने काम करीत आहेत. एकट्या अमेरिकेत तीस ते चाळीस लाख भारतीय आहेत. जागतिकीकरणामुळे जग हे एक वैश्विक खेडे झाले आहे. आय.टी.मुळे कल्पना, संशोधन, विचार आणि विचारसरणीचं प्रचंड प्रमाणात आदानप्रदान होत आहे. मल्टी नॅशनल कंपन्यांमुळे जगभर सर्वत्र एकाच बँडचे कपडे, खाद्य पदार्थ, शीतपेये आणि प्रसारमाध्यांमुळे सिनेमा, संगीत, नृत्य आणि जीवनशैली झपाट्यानं एकजिनसी होत आहे. एका अर्थानं शतकभर जे ती असणाऱ्या पाश्चात्त्य (पक्षी : अमेरिकन) जीवनशैली आणि इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली सर्व जग मोठ्या प्रमाणात आलं आहे. भारतापुरता विचार केला तर इथलं स्वदेशी एतद्देशीय त्याचा थोडाही पुरस्कार केला की त्याच्यावर संघविचाराचा असा शिक्का बसतो! ते कमअस्सल व अमेरिकन जीवनशैली आधुनिक व आजच्या युगाची म्हणून अनुकरणीय झाली आहे. त्यामुळे भारतात चौकोनी कुटुंब, वडीलधाऱ्यांना आता न सामावून घेणारी कुटुंब व्यवस्था, वाढते घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप, एल.जी.बी.टी.सारख्या बाबींचा वाढता स्वीकार, मोकळे स्त्री-पुरुष संबंध, औद्योगिक क्रांती व नव्या यंत्रामुळे मागील दोन दशकात कमी झालेले मानवी श्रम व सांस्कृतिक बाबीसाठी उपलब्ध झालेला मोकळा वेळ पुन्हा कमी होणं, वाढतं असामाजिकीकरण, मोबाईल, टी.व्ही. क्रांती, अन्न-कपडे व भाषेचे जागतिककीकरण व एकजिनसीपणा, वाढते स्थलांतर व अदेशीपणामुळं उखडली जाणं, कमी होणारी विविधता व स्थानिक महत्त्व- हे सारे सांस्कृतिक संदर्भ व बदल जागतिकीकरणाशी जोडले गेले आहेत. पुन्हा जागतिकीकरणाशी नीट सामना आपण करू शकत नसल्यामुळे बेरोजगारी, शेतकऱ्यांची विपन्न अवस्था, घसरलेली जीवनाची गुणवत्ताः शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात कमी झालेली भांडवली गुंतवणूक, सरकारचा संकोच, विघातक विकास- नीतीमुळे होणारा पर्यावरणाचा हास व त्याचा मानवी जीवनावरचा होणारा गंभीर परिणाम हे सारे बदल म्हणजे सांस्कृतिक स्थित्यंतर आहे व त्याचे पडसाद साहित्यामध्ये पडणे अपरिहार्य आहे. कारण साहित्याचे भांडवल भवतालचे जीवन व माणसाची सुख-दुःखं असतात. पण या साऱ्या बदलाचा नीट आवाका समजून घेणे, त्याचा अन्वयार्थ लावणे हे लेखकासाठी अपरिहार्य आहे, तसे असले पाहिजे असे मला वाटते.

अन्वयार्थ □ ३३७