पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्मितीसाठी काही पर्शियन शब्द वापरून उर्दूमिश्रित मराठी भाषा पात्रांच्या संभाषणासाठी वापरून मुस्लीम वातावरणनिर्मिती केली. कुठलही पात्रं थेट काळं किंवा पांढरं रंगवलं नाही, खरेखुरे सार्वजनिक नेते असल्यामुळे त्यांचं यथातथ्य चित्रण करताना त्यांचं वैयक्तिक जीवन व भावभावना मात्र प्रतिभेनं रचून त्यांचं मानवीकरण करायचा प्रयत्न केला. पण त्यांना मराठी ऐतिहासिक नायकांना जसं उंबरठ्यातकुटुंबजीवनात काहींनी बद्ध केलं तसं केलं नाही. जे देशावर राज्य करतात, त्यांचं लौकिक व सार्वजनिक जीवन महत्त्वाचं असतं. त्यांच्यासाठी कुटुंब नंतर असतं, हे वास्तवभान मी ठेवून त्यांचं चित्रण केलं! ही माझी लेखनप्रक्रिया मला स्वत:ला लेखक म्हणून बरीच समृद्ध करून गेली.
 मराठी लेखक प्रतिभावंत असल्यामुळे अभ्यास-चिंतन करीत नाहीत किंवा त्यांची गरज भासत नाही, हे मला स्वत:ला मुदलातच पटत नाही. तुम्ही जर स्वजीवनाच्या परिघाबाहेर जाणार नसाल तर बाब वेगळी; पण ज्यांना विशाल जीवनपट - मग तो मोठा समूह, देश-प्रांत वा जग या पातळीवर मांडायचा असतो किंवा विविध प्रश्न-समस्या मांडायच्या असतात त्यांना अभ्यास करावाच लागतो त्यामुळे प्रतिभेला नवे धुमारे फुटतात, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रतिभा व अभ्यासाचं द्वैत असतं हे मला मंजूर नाही.

 आणि चिंतन तर लेखकाला हवंच असतं. त्यासाठी ललितेतर वाचन, विविध शास्त्रांचं वाचन, आकलन व मनन हवं असतं. पुन्हा प्रश्न विचारणे, उत्तर शोधणे, माणूस वाचणे, माणसाचे जगण्याचे प्रश्न समजून घेणे - उदा. लिव्ह इन रिलेशनशिप, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, शहरीकरणामुळे माणसांचं तुटलेपण व एकटेपण; दहशतवाद, जात वास्तव, धर्मकारण, राजकारण व त्यातला सत्ता संघर्ष हे सारे सारे लेखकाला समजून घेणं आवश्यक असतं. त्यामुळे लेखक हा बहुश्रुत असलाच पाहिजे. आज इंटरनेट, गुगल सर्च, विकीपीडीया व इ-जर्नल्समुळे हव्या त्या विषयाची हवी ती माहिती संगणक उघडताच मिळू शकते. पण तिचं ज्ञानात रूपांतर करणं व त्याचा वापर करून कथानकातील पात्रांचं भवताल निर्माण करणं हे प्रतिभेचं काम आहे. पण त्याची आद्य व मूलभूत अट ही तुमचं चिंतन, तुमची बहुश्रुतता, तुमचे प्रश्न समजून घेणं व उत्तराचे विविध पर्याय तपासणं ही आहे. ती ज्या प्रमाणात जमते, तेवढी कलाकृती मोठी होते. मला वाटतं, जेव्हा अरुण साधंनी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'चं प्रकाशन करताना 'मला लक्ष्मीकांत देशमख यांचा हेवा वाटतो' असं म्हटलं, तेव्हा मी जिंकलो होतो. 'चंद्रकात बांदिवडेकराचं वाचल्यावर आनंदानं नाचणंच तेवढं बाकी होतं.' असं जेव्हा सौ. लीला बांदिवडेकरांनी मला फोननं सांगितलं, तेव्हा माझ्या परिश्रमाचं सार्थक झालं असं वाटलं!

अन्वयार्थ □ ३२५