पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रा. रूपाली शिंदे :
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'च्या प्रस्तावनेत 'अफगाणिस्थानच्या रूपाने आंतरराष्ट्रीय धार्मिक म्हणजे इस्लामी दहशतवाद' असं वेगळं स्पष्टीकरण का द्यावंसं वाटलं?
लक्ष्मीकांत देशमुख :
 अफगाणिस्थानमधला कट्टर इस्लामीयत्वातून सिद्ध झालेला दहशतवाद आता तालीबान, आयसिस, लष्करे तोयबा इत्यादीमुळे जगभर पसरला आहे हे सर्वश्रुतच आहे. तत्पूर्वी इस्रायल- अरबाच्या संघर्षामधून फोफावलेला अराफतचा दहशतवाद हा त्याच परिसरापुरता मर्यादित होता. पण अफगाणिस्थानचा धार्मिक दहशतवाद हा अमेरिका - रशियाच्या संघर्षाचा परिणाम होता. रशियाप्रेरित व त्यांनी सैन्य पाठवून जिवंत ठेवल्यामुळे अफगाणिस्थानमधील तराकी, अमीन बबराक करमाल व नजिबुल्ला यांची कम्युनिझमकडे झुकलेली राजवट (जिला मी इन्किलाब म्हणतो) उलथून पाडण्यासाठी धार्मिक नेत्यांनी लढा उभारला, तिला अमेरिकेनं बळ दिलं, तर पाकिस्ताननं आश्रय व लष्करी प्रशिक्षण दिलं. त्यातून काळाचे काटे मागे उलटणारा दहशतवादाचा पुरस्कार व समर्थन करणारा इस्लामी मूलतत्त्ववाद तालीबानच्या रूपानं उदयास आला व तो सीमारेषा ओलांडीत आज जागतिक झाला आहे. एका अर्थानं त्याची अफगाणिस्थान ही प्रयोगशाळा होती. ज्या अमेरिकेनं हा धर्माधिष्ठित दहशतवाद जोपासला, तो त्यांच्यावरच भस्मासुरासारखा उलटला व ट्विन टॉवर उद्ध्वस्त करून गेला. अमेरिकेचे वेडे साहस इराक व सीरियातील हस्तक्षेपामुळे दिसून आले. त्याचे भयंकर परिणाम आज जग भोगत आहे. त्यामुळे प्रस्तावनेत तसे म्हटले होते एवढेच. पण ते वास्तव निरीक्षण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.
प्रा. रूपाली शिंदे :
 अफगाणिस्तानमधला कडवा व कट्टर धर्माभिमान आणि भारतात असलेला 'जमातवाद' यांच्यामध्ये नेमका कोणता फरक आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :

 बराच फरक आहे असा माझा अभ्यास सांगतो. भारतातील जमातवादाला इतिहासातील हिंदू-मुस्लीम संघर्षाची पार्श्वभूमी आहे. नरहर कुरुंदकरांनी 'जागर' मध्ये याचे मूलग्राही विवेचन केले आहे, ते अजोड व बिनतोड आहे. मी कादंबरीत जे काही पाबाबत विवेचन केले आहे ते कुरुंदकरांच्या विचाराचा मागोवा घेणारे आहे. शरीयाप्रणित इस्लामी राज्य हे ध्येय अनेक इस्लामी राष्ट्र काही उघडपणे तर काही छुपेपणाने, बाळगतात. लष्करे तोयबा, आयसीस हे उघडपणे म्हणतात- भारतातही इस्लामी

३२६ □ अन्वयार्थ