पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कादंबरी लिहिण्यापूर्वी वर्ण्य विषयाचा किती अभ्यास करतात ते. अगदी रंजनपर 'बेस्ट सेलर' ठरवून लिहणारा आर्थर हेलीनं 'हॉटेल', “एअर पोर्ट', 'प्राईज'सारख्या कादंबऱ्या लिहिताना केवढा प्रचंड अभ्यास केला होता. कथानकाच्या विश्वासार्हतेसाठी ते आवश्यक असतं. आपल्या भालचंद्र नेमाड्यांनी 'कोसला' व चांगदेवच्या चार कादंबऱ्या जरी स्वानुभवावर लिहिल्या असल्या तरी 'हिंदू' लिहिताना त्यांनी किती प्रचंड व विविधरंगी अभ्यास केला आहे हे ती कादंबरी वाचताना जाणवतं. माझी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही बृहद्कादंबरी लिहायला जसा वेळ लागला, तसा प्रचंड अभ्यासही करावा लागला.
 कादंबरीची कथा- साठ वर्षाच्या कालखंडाची व अफगाणिस्थान या देशातील रक्तरंजित संघर्षाची आहे. त्यामुळे त्या देशाचा इतिहास व भूगोल मला प्रथम अभ्यासून तो अंतरंगात मुरवावा लागला. ही जशी 'फिक्शन' (ललित - कल्पनारम्य) कहाणी आहे, तशी ती वास्तव इतिहासाधारित ‘फॅक्ट' (सत्य) कहाणी होती. त्या दोन्हीचं मी मिश्रण केलं म्हणून ती ‘फॅक्शन' कादंबरी आहे. त्यासाठी राजा जहिरशहा ते मुल्ला मोहमद उमर पर्यंतच्या सर्व वास्तव अफगाणी पात्रांच्या जीवन-प्रवासाचा अभ्यास करणं भाग होतं, तसंच फिक्शन म्हणून त्यांच्या अवतीभवती वावरणारी, नात्यातील पण वास्तवाशी मिळती जुळती- अशी तीन प्रमुख पात्रे अन्वर, करीमुल्ला आणि इलियास मला सुचले. त्यांचे कुटुंबीय व त्यांचा १९५० ते २००१ च्या अफगाणिस्थानी इतिहासाशी समांतर कालबद्ध प्रवास मला सत्य घटनांच्या संदर्भात चित्रित करण्यासाठी अभ्यास करावा लागला. पुन्हा हा इस्लाम देश म्हणून इस्लाम धर्म-परंपरांचा अभ्यास आला. दहशतवादाची मुळं धर्मात आहेत का ते शोधावं लागलं. तेथे रशियाप्रणीत सौर क्रांती झाली म्हणून कम्युनिझमचा अभ्यास करणंही क्रमप्राप्त होतं. अफगाणिस्थानची १९७९ ची कम्युनिस्ट क्रांती आणि तिला अफगाणांनी जिहाद पुकारत दिलेलं उत्तर हा कादंबरीचा प्रमुख संघर्ष बिंदू असल्यामुळे कम्युनिझम, जागतिक शीतयुद्ध, अमेरिकेचे धोरण अशा असंख्य बाबी आल्या. पुन्हा या संघर्षात पाकिस्तान प्रमुख खेळाडू होता आणि अलिप्त चळवळीत झहीरशहा असल्यामुळे भारताचाही काही रोल होता. हे सारे व्यापक पटलावरचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे अभ्यासल्यावरच माझी कादंबरी सिद्ध झाली. मराठीत तरी आंतरराष्ट्रीय विषयावरची एका देशाची कहाणी प्रथमच अवतीर्ण झाली आहे, या माझ्या म्हणण्याला कोणी मला चॅलेंज करू शकणार नाही.

 सुमारे सात-आठ वर्षे अभ्यास केला. असंख्य पुस्तके व संदर्भग्रंथ, वृत्तपत्रे वाचली आणि माझ्या प्रतिभेनं कथानकासाठी घटना, पात्रं व क्रम निवडला. माझ्यासमोर लिहिताना कुठलही 'मॉडेल' नव्हतं, ज्याला मी अनुसरून लिहावं. अंत:स्फूर्तीनं लिहीत गेलो. आपोआपचा फॅक्शनचा फॉर्म गवसला. वातावरण

३२४ □ अन्वयार्थ