पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येणार नाही हे उघड आहे.
 पुन्हा मी ज्या त-हेचे अनुभव लिहून मांडतो, जे जग- ती माणसं मी साहित्यकृतीमधून दाखवतो, त्याप्रमाणे लेखनाचा घाट निर्माण होतो. त्यामुळे तुमचे निरीक्षण काही कलाकृतींच्या संदर्भात ढोबळपणे मान्य करता येईल. पण त्यात मनोविश्लेषण येत नाही हे मला मान्य नाही. फार तर लेखक म्हणून माझी मर्यादा आहे असे म्हणता येईल.
 तुमचं आणखी एक निरीक्षण, की माझ्या लेखनात गाव - भवताल फार तपशिलानं येत नाही, वास्तववादाची त्यामुळे पकड कमी होईल म्हणून... यावर मी थोडासा संभ्रमित आहे. खरंच असं माझ्या लेखनात होतं का? वाचकसमीक्षकांना असं खरंच वाटतं का? जर प्रकट चिंतन करायचं म्हटलं तर एक विधान मी करू शकेन. मला माझं स्वत:चं म्हणता येईल असं गाव नाही. कारण मला शेतजमीन नाही, त्यामुळे एका गावाशी कायम असं माझं नातं नाही. पुन्हा शिक्षण, बदलीमुळे मी निम्म्या महाराष्ट्रात वावरलो आहे. कोठेच तीन वर्षांपेक्षा जास्त राहिलो नाही. त्यामुळे असेल की काय, पण मी स्वत:ला 'बंजारा' समजतो. जरा तुम्ही विचार करा, गुन्हेगारीचा शिक्का असल्यामुळे एका गावी न रहाणारी पारधी जमात, अन्य भटकी मंडळी यांना तरी कुठं गाव असतं? त्यांनी लिहिलंलिहीत आहेतच की- त्यांच्या लिखाणात गाव कुठे असतं त्या अर्थानं जे आपल्या अंतरंगात पूर्णपणे मुरलेलं कुठं असतं? असा अदेशी भटका 'जनम् जनम् का बंजारा' हा लेखक म्हणून माझा फार मोठा तोटा आहे. मला नेहमीच ग्रामीण भागात शेतकरी व अन्य कारागीर जाती-जमातीत जन्मास आलेल्या व बाल ण व किमान नोकरीपर्यंतचा काळ तरी एका गावात व्यतीत केलेल्या, मुळे घट्ट असणाऱ्या लेखकांचा हेवा वाटत आला आहे. कारण आज शहरांच्या यांत्रिकीकरणामुळे व अमानवीकरणामुळे माणसे भेटत नाहीत, बोलत नाहीत. त्यामुळे ती कळत नाहीत. मुख्य म्हणजे त्यांच्या जीवनात फारसं घडत नाही ... मग लेखनाला कच्ची सामग्री व अनुभव कसे मिळणार?
 माझा आणखी एक वेगळाच वांधा आहे. मी धड ग्रामीण नाही अन् शहरी पण नाही. दोन्हीत वावरणारा, पण दोन्हीत फिट न होणारा. उच्चवर्गीय प्रशासनवर्तुळात वावरत असूनही विचार व संस्कारानं मध्यमवर्गीय मूल्यं मानणारा असल्यामुळे तेथेही मिसफिटच आहे. पण असे माझ्यासारखे अनेक आहेतच की. त्यामुळे त्यांच्या लेखनाचा घाट आपोआपच वेगळा राहाणार. तिथं कदाचित गाव असणार नाही- पण माणसं व प्रश्न असणारच की, असतातच की.

 आपण 'अंधेरनगरी' ही माझी कादंबरी जर बारकाईनं वाचली तर एका

३१८ □ अन्वयार्थ