पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शहराचं ते विस्तृत तपशिलाचं चित्रण आहे, असं तुम्हाला म्हणता येणार नाही? माझ्या मते तेथला शहर व त्याचा गाळीव अर्क म्हणजे नगरपालिका हेच या कादंबरीचं मध्यवर्ती पात्र आहे. 'पाणी! पाणी!!' मधील सर्वच कथांमधून येणारा अनुभव हा प्रातिनिधिक स्वरूपातील तहानलेल्या गावाचा व गावगाड्याचा आहे असं नाही का म्हणता येणार? म्हणून माझ्या लेखनात गाव - भवताल नाही असं म्हणणं कदाचित उचित ठरणार नाही.
प्रा. रूपाली शिंदे :
 निवेदन प्रधानता- निवेदनाचा दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे ही भूमिका घेऊन लेखन होते का? पात्रप्रधानता तितकीशी महत्त्वाची नाही असे तुम्हास का वाटते?
लक्ष्मीकांत देशमुख :
 या प्रश्नातून तुम्हांला जे सूचित करायचे आहे वा रोख आहे, तो मला यथार्थ वाटत नाही. पण याचं माझ्या लेखनाच्या संदर्भात उत्तर द्यायचं झालं तर प्रत्येक कथा वा कादंबरी स्वत:चा फॉर्म घेऊन येते असं म्हणलं जातं, ते मला पटतं व माझ्या साहित्यातही ते आढळून येऊ शकतं, असं माझं प्रांजळ मत आहे. अर्थात निवेदनप्रधानता हा कथानकासाठी महत्त्वाचा आहे, जसा तो एकमेव व माझ्या प्रत्येक कृतीमध्ये आलेला आहे, असं मला नाही वाटत. उलट मला पात्र प्रधानता अधिक महत्त्वाची वाटते. उदाहरण देऊन बोलायचं झालं तर 'स्वत:लाच रचित गेलो' या कथेमधील अनाथ असल्याचं जन्मरहस्य कळल्यावर नवऱ्याकडून झिडकारल्या गेलेल्या कमलचं काव्यवेड व त्यामुळे तिचं ‘पोएट्री थेरपी'नं बरं होणं यात कमलचं पात्र कथेचा गाभा असून त्या पात्राच्या व्हयू पॉईंटनं कथा आकारास येते. 'जोकर' मधील बुटका जोकरच्या उंचीपुढे त्याचे माणूसपण झिडकारले जाते, या कथानकात जोकरचं चरित्रचित्रण महत्त्वाचं आहे. 'अंधेरनगरी'मध्ये निवेदनशैलीत एका नगरपालिकेची कहाणी- तिच्या असंख्य पात्रे व घटनातून साकार होते, तर 'ऑक्टोपस'मध्ये घटनाप्रधानता आहे. पण तेथेही प्रमुख पात्रांचे चरित्र-चित्रण ठशठशीतपणे आले आहे. त्यामुळेच गजेंद्र अहिरे या प्रतिभाशाली दिग्दर्शकाला त्यावर सिनेमा करायचा आहे. त्यामुळे तुमच्या निरीक्षणाशी मी सहमत होऊ शकत नाही.

 पण ललित साहित्यातून लेखकाला काहीतरी सांगायचं असतं. मी संदेश वा विचार म्हणत नाही, तर नात्यांची गुंतागुंत वा समाजिक राजकीय प्रश्नांकडे लक्ष वेधायचं असतं. त्यामुळे लेखकाचा 'व्हयू पॉईंट' महत्त्वाचा ठरतो. तो ते कसा व्यक्त

अन्वयार्थ □ ३१९