पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छायाचित्राप्रमाणे खचितच नाही - हे स्वत:कडे कठोरपणे पाहात आपल्याच लेखनाची चिकित्सा केली तरी ते सत्य आहे असे मी ठामपणे म्हणू शकतो. माझ्यात - वाचकसमीक्षकात मतभेद एवढेच होऊ शकतात की ते किती उच्च दर्जाचे व वेगळे आहे. ते पेंटिंग आहे का छायाचित्र असा प्रश्नच उद्भवत नाही.
प्रा. रूपाली शिंदे :
 वास्तव चित्रणावर भर दिल्यामुळे तुमच्या साहित्यकृतीमध्ये व्यक्तिरेखेचे मनोविश्लेषण अतिशय कमी प्रमाणात येते असे वाटते. त्याला जोडून आणखी एक मुद्दा. कादंबरीत भोवताल, गांव यांचं विस्तारानं वर्णन केलं तर वास्तवाची पकड सैल होईल असं वाटत असल्यामुळे तुम्ही त्याचे तपशिलाने वर्णन केल्याचे आढळत नाही. यावर आपणास काय म्हणायचे आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :

 आपल्या या निरीक्षणाशी मी पूर्णत: सहमत होऊ शकत नाही. आज मुलाखतीच्या निमित्ताने मला माझे लेखनविश्व तपासण्याची संधी आहे. त्यामुळे शक्य तितके निर्लेपपणे व प्रामाणिकपणे मी उत्तर देणार आहे- देत आहे. आजच्या वर्तमानाचा आणि धगधगत्या सामाजिक वास्तवाचा मी भाष्यकर्ता लेखक आहे, इथवर तुमचं निरीक्षण मला मान्य होण्याजोगे आहे. मात्र आपण जर 'अंतरीच्या गूढगर्भी', 'अग्निपथ', "नंबर वन' मधील कथा पाहिल्या वा 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील तराना व झैनब, कारमाल- अनाहिता व अन्वर-तरानाचे परस्पर नातेसंबंध, स्त्रीपुरुषांच्या रिलेशनशिपचे नातेसंबंध पाहिले तर तेथे तुम्हास सखोल मनोविश्लेषण आढळून येईल. मात्र तुमचे निरीक्षण 'अंधेरनगरी' वा 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'ला काही प्रमाणात लागू होईल. तेथे पात्रापेक्षा समजाचित्रण- तेही सामूहिक जीवनाचं चित्रण मला करायचं होतं, तेथे अनुभवाचा एकेरीपणा, सत्तेसाठी काय वाट्टेल ते करणे वा 'मुलगाच हवा' या अट्टाहासातून स्त्रीभ्रूण हत्या करणे हे ठसठशीतपणे मांडणे जरूर आहे. पण जर वास्तव काळे- करडेच असेल व तेथे ग्रे छटा नसेल तर उगीच लेखनात ती का मांडायची? जो मालक बालकामगारांचे शोषण करतो, तो काळाच रंगवणार मी- कारण तेच वास्तव आहे, तेथे त्याचे अकारण मानवीकरण करणे सत्यापासून दूर जाण्यासारखे आहे. जगात क्रूर, विकृत आणि भावनाशून्य माणसे असतात, त्यांना उगाच 'ग्रे' शेड देत त्यांचे मानवीकरण करण्याची मला गरज वाटत नाही, उलटपक्षी ते माझ्यासाठी कलात्मक असत्यच आहे! एखाद्या प्रश्नाभोवती, एखाद्या संस्थेभोवती कथानक फिरत असेल तर तेथे माणसांपेक्षा तो प्रश्न, ती संस्था व तिचे स्वायत्त व्यक्तिनिरपेक्ष जगच अधिक प्रमाणात येणार. तेथे फारसे मनोविश्लेषण

अन्वयार्थ □ ३१७