पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उलट तोटाच झाला आहे असं मला वाटतं. कारण लेखकांच्या वर्तुळात असणं व त्याचं नेटवर्किंग करणं हे आज मराठी साहित्यक्षेत्रात गुण (?) मानले जातात, ते माझ्यात अजिबात नाहीत. ते माझ्या वृत्तीत नाहीत म्हणा, की ते मला योग्य वाटत नाही म्हणा; किंवा प्रशासकीय कामाचा व्याप- बदल्या यामुळे जमले नाही म्हणा, पण मी साहित्यक्षेत्राच्या परिघाबाहेरचा राहिलो आहे. त्यासाठी मी कधी जाणीवपूर्वक प्रयत्न फारसे केले नाहीत. आज मागे वळून पाहाताना ते केले असते तर लेखक म्हणून अधिक प्रस्थापित (?) झालो असतो. प्रशासनातील काही अन्य लेखकांनी हे असं केलं आहे याची माहिती आहे. पण माझ्याकडून ते झालं नाही, हे मात्र खरं.
 लेखन हे माझ्यातल्या प्रशासकाला 'रिलीफ' आहे असं मी मानत नाही. त्याचा अर्थ असा होतो की, काम हे (माझ्या संदर्भात प्रशासकीय काम) केवळ पोट भरण्यासाठी करायचं असतं. त्यासाठी पाट्या टाकायच्या असतात. आणि मन मारून . काम करावं लागतं. कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या प्रशासक कर्मचारी लेखकाबाबत कदाचित लेखन 'रिलीफ' होऊ शकतं. मला आता सहज आमचा परभणीच्या बी. रघुनाथांचं नाव आठवतं. ते सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ कारकून (आधी हंगामी पण) होते. त्यांना वरिष्ठांच्या जुलुमाचा, लहरीचा सामना करावा लागत होता. त्यांना लेखन रिलीफ नक्कीच वाटत असणार. कारण त्यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंत साहित्यिकाचं खात्याला फारसं सोयर-सुतक नव्हतं. उलट तो दुर्गुण ठरत होता. माझं तसं नाही. कारण एक तर मी 'बॉय चॉईस' बँकेची आरामदायी, कमी मानसिक कटकटीची नोकरी सोडून प्रथम डेप्युटी कलेक्टर- मग कलेक्टर झालो. दुसरं, प्रथमपासून मी क्लास वन ऑफिसर होतो. पुन्हा मला प्रशासनात बरंच भरीव काम करता आलं. अनेक प्रशासकीय पुरस्कार - अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्राप्त झाले. त्यामुळे कुचंबणा अशी झाली नाही. त्यामुळे लेखनात रिलीफ शोधणे हे माझ्यासाठी अपरिहार्य नव्हते. उलटपक्षी लेखक असल्याचा प्रशासनात झालाच तर फायदा झाला. कारण इतरांपेक्षा लोकांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, पुर्नवसनांचे प्रश्न मी अधिक संवेदनशीलतेने समजून त्यावर उपाय योजीत गेलो.

 माझ्यातला लेखक व माझ्यातला प्रशासक एका अर्थाने दोन्ही क्षेत्रात फायदेशीरच राहिला. हां- प्रशासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्यक्ष नेत्यांचे नाव घेऊन लेखन करणे, धोरणावर टीका करणे शक्य नव्हते, पण ते त्या विभागाचे नियम असतात आणि ते पाळावे लागतातच. पण लेखन हे कळ दाबून काढायचे, टिपायचे छायाचित्र नसते, तर प्रतिभेचे रंग मिसळलेले, अंतरंगातून उमटलेले पेंटिंग असते. वृत्तपत्रीय लेखन छायाचित्र असते तर सर्जनात्मक कथालेखन हे पेंटिंगप्रमाणे अलग कलात्मक वैश्विक वा सार्वत्रिक सत्य असते. माझ्या समजुतीप्रमाणे माझे लेखन पेंटिंगप्रमाणे आहे,

३१६ □ अन्वयार्थ