पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लेखकानं धाडसी असलं पाहिजे व निर्भीडपणे व्यक्त झालं पाहिजे, असं म्हणण्याचा प्रघात आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर जगण्यापेक्षाही मी लेखनात फार धाडसी व सच्चा आहे, असं माझं मत आहे. राजकारण, धर्मवाद, दहशतवादावर लिहिणं तसं सोपं नसतं. सांगलीत असताना एका व्याख्यानात मी इस्लाम संदर्भात 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'च्या निमित्ताने काही वास्तव मांडले होते. ते एक स्थानिक वृत्तपत्रात संदर्भ सोडून आले, त्यामुळे माझ्या निषेधाचे सत्र सुरू झाले. अगदी पोलिस गुप्तचर विभागाकडून त्यावर अहवाल शासनाने मागवला गेला. त्यावेळी माझ्यावर चौकशी किंवा निलंबन - शिक्षा आदी कार्यवाही होण्याची पाळी आली होती. पण मी ठाम होतो. एका वाचनप्रेमी व मला जवळून ओळखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे काही झालं नाही. दुसरं असंच एका लेखामुळे मला शासनाचा मेमो व तीव्र नापसंती व्यक्त करणारा खलिता आला होता. अशी दडपणं प्रशासक असलेल्या लेखकाला सहन करावी लागतातच. कारण मी आजचं वास्तव लिहितो हे त्याचं कारण आहे.
 एक प्रशासक म्हणून धार्मिक दंगली, हिंसाचार आणि जातीय ताण-तणावाला भिडावं लागतं, काही एक निर्णय घ्यावे लागतात. हे सारे अनुभव एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून काम करतानाही मनाच्या एका कोपऱ्यात खुणावत असतात, त्याची नोंद घेत असतात. हे अनुभव मी 'अंधेरनगरी', 'अग्निपथ' व 'जात नाही ती जात', 'हिरा जो भंगला नाही' आदी कलाकृतींमधून धीटपणे व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. धार्मिक दंगल, दलितांवर होणारे सामुदायिक बहिष्कार आणि सत्ताधाऱ्यांची मनमानी... या साऱ्यांवर मी यापुढे अधिक लिहिणार आहे... प्रत्यक्ष काम करताना त्याचा मी जरूर समर्थपणे सामना केला आहे, त्यासाठी वारंवार होणारी बदली आणि दोन वेळा अकारण मानसिक खच्चीकरण करणारी चौकशी मी सहन केली आहे. हे अनुभव मला माझ्या प्रशासकीय कारकिर्दीत मांडता आले नाहीत, कारण पदाची मर्यादा, कायदे कानून- नीतीनियम.पण आता यापुढे कदाचित त्यावर मी नक्कीच लिहू शकेन असं वाटतं !
प्रा. रूपाली शिंदे :
 प्रशासनातील नोकरी करताना 'लेखक' असणं याचा साहित्य वर्तुळात वावरताना फायदा झाला का? लेखक असणं हे तुमच्यातील प्रशासकाला एक "रिलीफ' आहे असं वाटतं, की व्यक्त होण्याचा अवकाश आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :

 अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर माझं नि:संदिग्ध उत्तर 'नाही' असंच आहे. मला प्रशासकीय नोकरीत असल्याचा लेखक म्हणून साहित्यवर्तुळात फायदा नाही,

अन्वयार्थ □ ३१५