पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्यकृतींच्याद्वारे व्यक्त करावीशी वाटली असे वाटत आले आहे? जिचा शोध सातत्याने आपण घेतला पाहिजे असं तुम्हांला नेहेमीच वाटतं अशी कोणती गोष्ट आहे का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 तुमच्या प्रारंभिक प्रश्नाला उत्तर देताना याबाबत थोडं विवेचन येऊन गेलं आहे, तरीही मला पुन्हा या प्रश्नाचं उत्तर जरा विस्तारानं द्यायला आवडेल. याचं प्रमुख कारण म्हणजे लेखक म्हणून माझ्यापरीनं हा प्रश्न मला मी सतत विचारत आजवर आलो आहे. याचं उत्तर असं देता येईल की, प्रत्येक लेखक हा जसा त्याच्या काळाचं प्रॉडक्ट असतो- त्याचा जन्म ज्या गावी / भागी झाला आहे, त्याचं घर-भवताल कसं आहे आणि त्याचे जीवन कशा व कोणत्या प्रकारे घडत गेलं आहे, त्यावर त्याचं लेखकपण व लेखनातलं (असेल तर) वेगळेपण- त्याहून अधिक त्याचा अंत:स्वर ठरला जातो. ही नियती म्हणा, योग म्हणा वा अन्य काही. ते काही आपल्या हाती नसतं. पण त्याचा एक फायदा असा की, एका सारखा दुसरा लेखक नसतो. कारण प्रत्येकाचं जगणं- अनुभव- त्याचा साद-प्रतिसाद, त्याचा नजरिया आणि नकारात्मक-सकारात्मक दृष्टिकोन, त्याचा ध्येयवाद वा त्याचा अभाव, जगाकडे गंभीर खेळकर, तिरकस किंवा अॅबसईतेनं पाहाणं वेगळं असतं. त्यावरून त्याच्या लेखनातून तो कांही एक जीवनाचा शोध घेत असतो. आणि तो त्याचा स्वत:चा स्वतंत्र असतो. माझाही आहे.

 माझा जन्म व पहिली किमान चाळीस वर्षे मराठवाड्यातील विविध गावात गेली. माझा जन्म, शिक्षण, नोकरीची पहिली पंधरा वर्षे, लग्न आदी तिथंच झालं. निजामकालीन संस्कार व खुणा आज पुसट झाल्या तरी त्या माझ्या घडणीच्या काळात बऱ्याच दृश्यमान होत्या; कारण हैद्राबाद शहर व आजच्या तेलंगण राज्याशी सतत संपर्क, नातेसंबंध. पुन्हा घरचं वळण मध्यमवर्गीय भाबड्या संस्काराचं. जीवनमान नेमस्त आणि समाजसंमत नीती-नियमानं बांधलं गेलेलं. पण माझं अफाट वाचन, जगाकडे पहाण्याची दृष्टी आणि अखंड जिज्ञासा यामुळे मनात डावीकडे झुकणारे विचार रुजत गेले. प्रथम औरंगाबादचं पदव्युत्तर जीवन, मग बँक आणि प्रशासनातले अनुभव- भेटणारी सर्व स्तराची माणसे यामुळे मी अनुभवसंपन्न झालो. समाजाचं एक व्यापक आकलन सहजतेनं होत गेलं आणि लेखन-वाचनात रमणारं माझं तीव्र संवेदनशील मन ते सारं जगण्यातून-पहाण्यातूनअनुभवण्यातून आणि वाचनातून आलेलं टीपकागदाप्रमाणे टीपत गेलं. आणि माझ्यातला लेखक घडत गेला.

अन्वयार्थ □ ३११