पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेतीचं उदाहरण द्यायचं झालं तर काही पिकं- काही फुलं लवकर पक्व होतात, फुलून येतात; तर काहींना वेळ लागतो व उशिरानं फुलतात. जसा साधा ऊस व आडसाली उसाचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी-अधिक आहे. मी आडसाली ऊसासारखा किंवा दीर्घकाळानं फुलोऱ्यात येणाऱ्या पिकासारखा 'लेट ब्लुमिंग' वर्गातला लेखक आहे. अजूनही माझी पक्व होण्याची व फुलण्याची प्रक्रिया थांबलेली नाही, त्यामुळे अजून दीर्घकाळ माझ्यात निर्माणक्षमता राहील असं माझं मन मला सांगतं. त्यामुळे एक फायदा असा होतो व मला झालाही आहे की, पक्व होण्याचे काही टप्पे गृहीत धरले तर प्रत्येक टप्यावर माझं लेखनाचं अनुभवक्षेत्र भिन्न भिन्न राहिलं. एका रंगात रंगणारा मी लेखक नाही. मी अनुभवाच्या संदर्भात सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखा लेखक आहे. त्याचं थोडं विवेचन करतो.
 प्रथम किशोर-कॉलेजवयीन- लग्न होईपर्यंतच्या जीवनटप्प्यावरचे माझे लेखन काहीसे आत्मपर व भवतालचे होते. प्रेम, भिन्नलिंगी आकर्षण, मैत्री, रिलेशनशिपची गुंतागुंत या परिघातले होते. 'कथांजली' आणि 'अंतरीच्या गूढगर्भी'मधील कथा अशा स्तरावरच्या आहेत. पण बालपणापासून माझ्यात एक सामाजिक माणूस दडला होता, तोही तेवढाच जागृत होता. त्यामुळे त्याही काळात 'हिबकुशा', 'रात्र', 'जोकर'सारख्या कथा किंवा 'सलोमी' ही लघुकादंबरी लिहीत होतो. मग प्रशासनातील अनुभवावर 'अंधेरनगरी', 'ऑक्टोपस' लिहून झाले. मग जगताना, काम करताना ज्या प्रश्नांनी वा विषयांनी अस्वस्थ केलं, पछाडलं किंवा मिठीत घेतलं, त्यावर लेखन झालं. त्यातूनच थीमबेस्ड अशा तीन कथामालिका, कथासंग्रह रूपातून साकारले. 'तहानलेल्या महाराष्ट्राचा कथा' या उपशीर्षाचा पाणी प्रश्नाचा वेध घेणारा 'पाणी! पाणी !!' हा कथासंग्रह, स्त्री भ्रूणहत्येची दाहकता मांडणारा सामाजिक दस्तऐवज स्वरूपाचा संग्रह 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' आणि बालमजुरीच्या प्रश्नाचा वेध घेणारी कादंबरी 'हरवलेले बालपण' लिहून झाली. माझा आणखी एक अंत:स्वर आहे, तो म्हणजे मला कलावंतांच्या खाजगी जीवनाचं निकोप कुतूहल आहे. त्यात खेळाडू व सिनेकलावंत महत्त्वाचे. 'नंबर वन' मधून खेळाडूंमधील सामान्य माणूस शोधायचा मी प्रयत्न केला, तर 'अखेरची रात्र' मधून मी एका कलावंताच्या आत्महत्येचा शोध कला विरुद्ध माणूसपणा अशा द्वंद्वाची निर्मिती करून शोधला.

 आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' बद्दल काय सांगावे? मला देश व जगातील घडामाडींचं व प्रश्नांचं चांगलंच भान व जागरूकता आहे. जगापुढे दहशतवाद, युद्ध, धर्माचा अतिरेक आणि 'खाऊजा' (खाजगीकरण, उदात्तीकरण, आणि जागतिकीकरण) मुळे जगातील गरीब राष्ट्रातील नागरिकांवर झालेला विपरीत

३१२ □ अन्वयार्थ