पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांनी 'अंधेरनगरी'वर प्रथम हिंदीत मग मराठीत परीक्षण लिहून माझी बरीच प्रशंसा केली. जेव्हा त्यांनी माझी 'इन्किलाब' वाचली, तेव्हा ती त्यांना प्रचंड आवडली होती. त्यांच्या पत्नीनी मला फोनवर सांगितलं होतं की, सरांना ते वाचल्यावर नाचावंसं वाटलं. प्रा. म. द. हातकणंगलेकर सरांना तिची जातकुळी टॉलस्टॉयच्या 'वॉर अँड पीस'शी आहे असं वाटलं. पण या दोघांनी त्यावर त्याकाळी वाङ्मयीन मासिकात परीक्षण लिहिलं असतं तर मला लेखक म्हणून त्याचा अधिक प्रस्थापित होण्यात मदत झाली असती. हीच बाब डॉ. सदानंद मोरे यांची. पण त्यांनी माझ्या साहित्य समीक्षापर ग्रंथात- ज्यासाठी आपण माझी ही मुलाखत घेत आहात- त्यात एक लेख लिहून मला उशीरा का होईना न्याय दिला आहे; असं म्हणता येईल.
 आज या टप्प्यावर मागे पाहताना वा विचार करताना वाटतं की प्रतिसाद हा लेखनाला मदत करतो असं नाही, पण लेखकाला हे सांगणारा असतो की, तू जे काही लिहित आहेस ते चांगलं आहे, ग्रेट आहे वगैरे वगैरे. पण त्यामुळे लेखकाला लिहिताना विशेष फरक पडतो असे नाही. काही लोकप्रिय बेस्टसेलर लेखक आम्ही केवळ वाचकांसाठी लिहितो, समीक्षकांची पर्वा करीत नाही असं जे म्हणतात तसं मी म्हणणार नाही. कारण समीक्षा व प्रतिसाद ही लेखकानं 'राईट स्पिरीट'नं घेतलं तर पुढील लेखनासाठी अप्रत्यक्षपणे ते अधिक कसदार होण्यासाठी मददगार सिद्ध होतात असं वाटतं. नांदेडच्या फेब्रुवारी २०१५ च्या होऊ घातलेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रणधीर शिंदे संपादित समीक्षा ग्रंथामुळे मला माझ्या लिखाणाकडे समीक्षकीय दृष्टीने पहाता येण्याची संधी मिळते आहे. समीक्षेमुळे लेखकाला त्याची बलस्थानं व त्याच्या लेखनाची जातकुळी पुन्हा ठसठशीतपणे जाणवते, तशीच त्याची त्यांना वाटणाऱ्या उणिवा, मर्यादाही लक्षात येऊ शकतात. अर्थात समीक्षकांचा शब्द हा काही अंतिम नसतो. तो त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं मत असतं. पण सर्जनशील लेखन हे लेखकसापेक्ष असतं. त्याचा व्यक्तिमत्त्वाची, जीवनाची आणि त्याच्या अनुभवाची, ती घेण्याची आणि त्याच्या संवेदनशीलतेची मर्यादा त्याच्या लेखनाला असते. ते त्याचं एकप्रकारे वेगळेपण असतं. व सामर्थ्यही असतं. जेव्हा प्रा. अविनाश सप्रे यांनी 'हरवलेले बालपण' ही 'सिनेमासारख्या डॉकु-नॉव्हेल (docu - Novel) म्हणजे डॉक्युमेंटरी आणि कादंबरी याची सांधेजोड करणारी वेगळ्या परिमाणाची कादंबरी आहे' असं निरीक्षण नोंदवलं, मला ते पटलं. आणि आपण काही वेगळं लिहिलं याचं समाधान वाटलं!
विनोद शिरसाठ :

 साहित्य लेखनामागची आपली मूळ प्रेरणा कोणती आहे, जी तुम्हांला सर्व

३१० □ अन्वयार्थ