पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

P

कथाही या प्रामुख्याने अगम्य अशा मानवी मनावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत असं वाटतं. कारण एक लेखक म्हणून मला स्वत:वर कोणताच शिक्का असावा असं वाटत नाही. मुख्य म्हणजे मला विविध क्षेत्रांवर, तसंच विषयावर सुचत असतं. तरीही अंतर्मनाचा शोध ही माझी एक लेखक म्हणून प्रेरणा आहे. माझं 'अखेरची रात्र' हे नाटक त्याचं लखलखतं उदाहरण म्हणून सांगेन.
  पण तरीही मागील तीन दशकातील बदलत्या काळाचं समकालीन वास्तव टिपणारा मी 'जागल्या' लेखक आहे. असा जागल्या लेखक की जो जागरूकतेनं व संवेदनशीलतेनं माणसं, समाज व त्यांचे प्रश्न टिपतो व त्याला स्वत:च्या भावविश्वात व विचारात मुरवून कथा / कादंबरीच्या रूपात प्रगट करतो. मी स्वभावाने सकारात्मक विचाराचा व आशावादी आहे. मला सिनिसिझम आवडत नाही. ती माझी वृत्ती नाही. मला उदात्ततेचं व मांगल्याचं आकर्षण आहे. आणि आजचं सडलेलं वर्तमान जगतानाही ध्येयवाद व 'सुबह कभी तो आयेगी' हा दुर्दम्य आशावाद मी बाळगतो. हा माझा मनःपिंड आहे, माझा स्वभावधर्म आहे. आणि त्यामुळेच माझे लेखन सिनिसिझम, अॅबसर्डिटीकडे झुकत नाही. ही माझी मर्यादा आहे का बलस्थान, त्याचा निवाडा वाचक व समग्र भान असणाऱ्या साक्षेपी समीक्षकांनी करायचा आहे. त्यांचा काहीही कौल असला तरी मी माझा अंत:स्वर जपतच व तो प्रगट करीतच लिहीत जाणार. वाचकांचा, प्रसिद्धीचा वा समीक्षकांच्या मान्यता / टीकेचा विचार न करता माझं सामर्थ्य-प्रतिभा आणि मर्यादेसह (ती कुणा लेखकाला, शेक्सपिअर वा शरदचंद्रासारखे कालातीत लेखक वगळता कुणाला, नाहीय?) लिहीत रहाणार. हे माझ्या लेखनाचे तत्त्वाज्ञान म्हणा ना!
. प्रा. रूपाली शिंदे :
 साहित्य लेखनाची सुरवात, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि आज स्वत:च्या लेखनप्रवासाकडे मागे वळून पाहाताना या साऱ्यांचा विचार तुम्ही कसा करता? हे जाणून घ्यायला आवडेल.
लक्ष्मीकांत देशमुख :

 फार चांगला आणि विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. माझ्या घरात शिक्षणाची परंपरा असली तरी साहित्याची परंपरा व वाचण्याची हौस पण नव्हती. अपवाद माझ्या आईचा. ती पट्टीची वाचक होती. पण ती ज्या परंपरागत व धार्मिक संस्कारात वाढली व ज्या कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचा ती भाग होती, त्यामुळे तिचं वाचन हे खांडेकर, फडके आणि शैलजा राजे- शकुंतला गोगटे या परिघातलं होतं. पण तिनं मला वाचनाची गोडी लावली. हे माझ्या जडणघडणीत फार महत्त्वाचं

३०८ □ अन्वयार्थ