पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरलं असं मला म्हणता येईल. त्यामुळे मला का लिहावंसं वाटलं व त्याला सुरवातीचा प्रतिसाद कसा होता, हे सांगायचं म्हटलं तर आसपास साहित्यिक वातावरण असं नव्हतं, त्यामुळे हा मुलगा काहीतरी लिहितोय, ते छापून येतंय याचं कौतुक व्हायचं. पण त्यात चिकित्सा वा डोळस वाचन हा प्रकार नव्हता. पुन्हा मी सायन्सचा विद्यार्थी, म्हणून कॉलेजमध्ये पण लेखनप्रेमी मित्र असा नव्हता. तरीही मी आत्मप्रेरणेनं कसा लिहीत राहिलो याचं मला आजही न सुटलेलं कोडं आहे. पण तरीही नांदेडला माझ्या कॉलेज जीवनात नरहर कुरुंदकर तेव्हा पूर्ण जोमात असल्यामुळे त्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव होता. त्यांना माझी एका कथास्पर्धेमधली बक्षिसपात्र कथा आवडली होती व त्यांनी त्याचं कौतुकही केलं होतं. ते मला हुरूप देणारं टॉनिक होतं. पहिल्या पाच-सहा कथांना विविध स्पर्धेत पारितोषिकं मिळाल्यावर आपण बरं लिहू शकतो हे जाणवलं; मग लेखनाचा सिलसिला जारी राहिला.
 'अंधेर नगरी', 'अंतरीच्या गूढगर्भी' या सुरुवातीच्या पुस्तकांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर अनेकांनी वृत्तपत्रात परिक्षणं लिहिली. मराठवाड्याचे थोर समीक्षक सुधीर रसाळांचं मला 'अंधेर नगरी' वाचून लिहिलेलं पत्र आजही माझ्या संग्रही आहे. पण तरीही माझा मराठवाड्यातील लेखक-समीक्षकांशी निकटचा (सतत प्रशासकीय बदलीमुळे) संबंध येऊ शकला नाही. त्यामुळे माझ्या साहित्यावर तेवढं लिहून आलं नाही हेही खरं. पण 'पाणी! पाणी!!' आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' प्रसिद्ध झाल्यावर हे चित्र बदललं. या दोन कलाकृतींवर बरंच परीक्षण प्रसिद्ध झालं. वाचकांचाही पत्र-फोन द्वारे मिळणारा प्रतिसाद लेखक म्हणून मला सुखावून गेला. आता मला लेखनासाठी स्वप्रेरणा पुरेशी आहे. प्रतिसाद हा मी बोनस समजतो. बोनस हा पगारावर दिला जातो. त्यावर आपल्याला हक्क सांगता येत नाही. लेखन हे माझं काम. ते वाचकांना आवडलं वा ना आवडलं- दोन्ही त-हेचा प्रतिसाद... हा मला बोनस वाटतो. तो मिळाला तर आनंद आहे; पण मला हेही माहीत आहे का, आपला निश्चित असा वाचकवर्ग आहे. जेव्हा शास्त्रीय गायिका अश्विनी देशपांडे वा अभिनेत्री ज्योती सुभाष योगायोगानं झालेल्या भेटीत 'मी तुमचं अमुक तमुक वाचलंय आणि ते आवडलंय' असं सांगतात, तेव्हा समाधान वाटतं. लेखक म्हणून आपण नक्कीच प्रस्थापित झालो आहोत असं वाटतं

 मला दोन दिग्गजांच्या प्रतिसादाचा उल्लेख केला पाहिजे. एक म्हणजे विजय तेंडुलकर. त्यांना माझी 'अंधेरनगरी' ही कादंबरी खूप आवडली होती. त्यांनी मला एक त्याबाबत पत्र लिहिलं होतं, पण ते मला मिळालं नाही, याची हळहळ वाटते. पण 'ललित' मासिकात त्यांच्या आवडत्या ५० पुस्तकांत त्याचा समावेश केला होता, त्याचं मला समाधान आहे. दुसरी व्यक्ती आहे समीक्षक चंद्रकांत बांदिवडेकर.

अन्वयार्थ □ ३०९